
सामना प्रतिनिधी । मुंबई
पावसाळय़ात मुंबईतील खड्डे या वर्षीदेखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या ‘कोल्डमिक्स’ने बुजवले जाणार आहेत. यासाठी पालिकेने वरळी प्लांटमध्ये 1150 मेट्रिक टन उत्पादन केले असून सर्व 24 वॉर्डमध्ये आवश्यकतेनुसार 930 मेट्रिक टनचे वितरणही करण्यात आले आहे. कोल्डमिक्समुळे भरपावसातही खड्डे बुजवता येणार आहेत.
मुंबईतील पावसाळय़ात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिका 2017 पासून ‘कोल्डमिक्स’चा कापर करीत आहे. हे कोल्डमिक्स पालिका सुरुवातीला ऑस्ट्रेलियाकडून घेत होते. यासाठी प्रतिकिलो 170 रुपये मोजावे लागत होते. यानंतर पालिकेने वरळी येथे प्लांट उभारून कोल्डमिक्सचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे कोल्डमिक्स बनवण्यासाठी पालिकेला प्रतिकिलो फक्त 27 रुपये खर्च येत आहे. गेल्या वर्षी वरळी प्लांटमध्ये एक हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन केले होते. यातील 800 मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला.
सर्व वॉर्डमध्ये 930 मेट्रिक टनचे वाटप पूर्ण आवश्यकतेनुसार वाटप
पावसाळय़ात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये त्या त्या विभागाच्या मागणीनुसार कोल्डमिक्सचे वितरण करण्यात आले आहे. या वर्षी पावसाळय़ासाठी 1200 मेट्रिक टन कोल्डमिक्स बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यातील बनवण्यात आलेल्या 1150 मेट्रिक टन कोल्डमिक्सपैकी 930 मालाचे वितरणही करण्यात आले आहे.






























































