
मागील चार महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावाच्या प्रस्तावाला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बारा जणांची नावे एका पाकीटातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या नावांना मंजुरी दिल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत अखेर चर्चेला आला. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रत्येकी चार नावांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येते. मंत्रिमंडळाने या नावांना मंजुरी दिली आहे. आता ही नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येतील. मात्र या नावांबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात येत आहे.
त्यामुळे राजकीय क्षेत्रात या नावांविषयी कमालिची उत्सुक्ता निर्माण झाली आहे. सर्वच प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या मंत्र्यांना फोन करून या नावांबाबत विचारणा केली. पत्रकारांच्या सततच्या फोनमुळे काही मंत्र्यांनी तर मोबाईल फोन बंद करून टाकले. या बारा जणांची नावे बंद पाकिटातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे एका मंत्र्यांने सांगितले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर या नावांबाबत विचारणा करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्रकारांनी धाव घेतली. त्यावर आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली येवढीच माहिती भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.


























































