
अरबी समुद्रात कोचीच्या किनारपट्टीजवळ शनिवारी तब्बल 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) आणि हिंदुस्थानी नौदलाने संयुक्तरीत्या राबवलेल्या ‘समुद्रगुप्त’ ऑपरेशनमध्ये उच्च शुद्धतेच्या ‘मेथामफेटामाइन’ ड्रग्जचा अडीच हजार किलोचा साठा जप्त केला. तसेच एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले. देशातील ड्रग्ज जप्तीची ही चालू वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.
दोन वर्षांपूर्वी ड्रग्ज तस्करीचा राजमार्ग ठरलेल्या गुजरातच्या मुंद्रा बंदरातून जवळपास तीन हजार किलो हेरॉईनचा साठा जप्त केला होता. त्यानंतरही ड्रग्ज तस्करीचा गोरखधंदा जोरात सुरू राहिला. त्या पार्श्वभूमीवर एनसीबी आणि नौदलाने कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे हिंदुस्थानात होणारी ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी ‘ऑपरेशन समुद्रगुप्त’ राबवले जात आहे. या ऑपरेशनअंतर्गत शनिवारी कोचीच्या किनारपट्टी भागात तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या ‘मेथामफेटामाइन’ ड्रग्जच्या तस्करीचा पर्दाफाश झाला. कारवाईत जप्त केलेल्या ड्रग्जच्या पाकिटांवर ‘हाजी दाऊद ऍण्ड सन्स’ आणि ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिल्याचे आढळले आहे. हा ड्रग्ज साठा हिंदुस्थानसह श्रीलंका आणि मालदीवला पाठवला जाणार होता. बलुचिस्तानच्या मकरान किनाऱयावरून ‘मेथामफेटामाइन’चा साठा घेऊन जहाज निघाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जहाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून अखेर कोचीच्या किनारपट्टी भागात जहाजावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात 12 हजार कोटींचा ‘मेथामफेटामाइन’चा साठा हाती लागला.

























































