बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरीत

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने दि. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक संदीप गबाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बाराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उ‌द्घाटन होणार आहे. त्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष ह.भ.प. तुकाराम महाराज ठाकूरबुवा नुतन संमेलनाध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द करतील. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दुपारी एक वाजता मारुतीमंदीर येथून दिंडी निघणार आहे. सायंकाळी चार वाजता ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता महिला भजनी मंडळाचा सामुहिक हरिपाठ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंधश्रध्दा व जादूटोणा विरोधी या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये अध्यक्षस्थान ह.भ.प. गुरुबाबा महाराज अवसेकर भूषवणार आहेत. ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प.पांडूरंग महाराज राशीणकर, दिनेश डिंगळे आणि प्रवीण मोरे हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी साडेअकरा वाजता देशाची प्रगती, सामाजिक स्थिती यातून पत्रकारिता या परिसंवादाचे अध्यक्षस्थान नितीन सावंत भुषवणार आहेत. यामध्ये जयसिंग कुंभार, मनोज भोयर आणि रवी आंबेकर हे वक्ते सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता ह. भ. प. सुभाष महाराज गवळी यांचे भारुड होणार आहे. सायंकाळी चार वाजता ह.भ.प. निवृत्ती महाराज रामदास यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता महिला भजनी मंडळाचा सामुहिक हरिपाठ आणि सायंकाळी सात वाजता ह.भ.प. गुरुबाबा महाराज अवसेकर यांचे चक्री भजन होणार आहे. बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दहा वाजता खुले अधिवेशन आणि अकरा वाजता सांगता समारंभ होणार आहे. या संमेलनात श्रीमंत सरदार उर्जितासिंह राजेशितोळे, ह.भ.प. मनोहर महाराज आवटी यांना श्री विठ्ठल पुरस्कार आणि वै.ह.भ.प. भानुदास महाराज ढवळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.s