हिमाचलमध्ये इमारत कोसळली; 30 जवान दबले, 13 जणांचा मृत्यू

17

सामना ऑनलाईन, सिमला

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्हय़ात कुम्हारहट्टी मार्गावर एक बहुमजली इमारत अचानक कोसळली. ढिगाऱयाखाली दबून 14 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी लष्कराचे 13 जवान आहेत. हे जवान इमारतीमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. सोलन जिल्हय़ातील कुम्हारहट्टी-नाहन मार्गावर एक बहुमजली इमारत आहे. ही इमारत 2009 मध्ये बांधण्यात आली असून, अलीकडेच या इमारतीचा विस्तार करून त्यावर एक मजला चढवण्यात आला होता. याच इमारतीमध्ये एक ढाबा असून, येथे कायम गर्दी असते. लष्कराची छावणी याच भागात असल्यामुळे जवानांची येथे रेलचेल असते. रविवारीही 30 जवान जेवण्यासाठी या ढाब्यावर आले होते. अचानक भूकंप आल्याचा आभास झाला आणि निमिषार्धात ही बहुमजली इमारत धाराशायी झाली. इमारतीच्या मलब्याखाली 42 जण दबले गेले. घटनास्थळावर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. ढिगाऱयाखाली दबलेल्या 28 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र 14 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यात 13 जवानांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी विवेक चंदेल यांनी सांगितले. इमारत बांधून पुरती दहा वर्षेही झाली नाहीत. त्यामुळे इमारत कशी काय कोसळली याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सोलन मनपाचे उपायुक्त के. सी. चमन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या