
25 कोटी रुपये प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने प्रभाकर साईलचा अखेर जबाब नोंदवला. गेल्या दोन दिवसांत एनसीबीने साईलची 15 तासांहून अधिक चौकशी केली आहे. तर आज एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर ज्ञानेश्वर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.
क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक करू नये म्हणून 25 कोटी रुपये मागण्यात आल्याचे पंच प्रभाकर साईलने सांगितले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेची दखल घेत एनसीबी दक्षता पथकाची एक टीम मुंबईत आली. या टीमने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह पाच अधिकारी आणि तीन खासगी असे मिळून 8 जणांचा जबाब नोंदवला होता. साईलच्या जबाबाशिवाय ती चौकशी अपूर्ण असल्याने एनसीबीला त्याचा जबाब नोंदवायचा होता. एनसीबीने साईलचे वकील आणि त्याच्या नातेवाईकांमार्फत समन्स पाठवण्याचा प्रयत्न केला होता. दिल्लीहून तपासासाठी मुंबईत आलेल्या पथकाने साईलला समन्स करून चौकशीसाठी बोलावले. अखेर सोमवारी साईल हा त्याच्या वकिलासोबत वांद्रे येथील एसआरपीएफच्या मेसमध्ये चौकशीसाठी आला. त्याची एनसीबीच्या विशेष एसआयटीने 10 तास चौकशी करून आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आज साईल हा पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी आला होता. रात्री उशिरापर्यंत एनसीबीचे अधिकारी हे साईलचा जबाब नोंदवत होते. तर दिल्लीहून आलेल्या एसआयटीने आर्यन खानला चौकशीसाठी रविवारी समन्स केले होते. मात्र काही कारणास्तव आर्यन अजून चौकशीसाठी आलेला नाही.
करण सजनानीला एनसीबीचे समन्स
ड्रग्ज प्रकरणात आज एनसीबीने व्यावसायिक करण सजनानीला चौकशीसाठी समन्स केले आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी एनसीबी मुंबई युनिट तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी खार परिसरातून अनुज केसवानीला अटक केली होती. एनसीबीने अनुजची चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच खार येथे एक पार्सल आले होते. त्या पार्सलचा एनसीबीने शोध घेऊन ब्रिटिश नागरिक असलेल्या करण सजनानीला अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीने करणला समन्स करून बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
नवाब मलिकांविरोधात तक्रार
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सहायक पोलीस आयुक्त ओशिवरा विभाग यांच्याकडे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मलिक हे वारंवार आपल्या कुटुंबावर खोटे आरोप केल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांचे म्हणणे आहे. ज्ञानदेव यांनी सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देत मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोमवारी मलिक यांनी हर्षदा रेडकर यांच्यावर 2008 साली एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याचे सांगितले होते. त्यावर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देऊन त्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचे
25 कोटी प्रकरणात एनसीबीच्या पथकाला लोअर परेल ते क्रूझ टर्मिनसपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज हवे आहेत. ते सीसीटीव्ही फुटेज तपासाला नवी दिशा देणार आहे. आर्यनच्या सुटकेसाठी पैशाची मागणी केल्यावर किरण गोसावी, सॅम आणि शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हे लोअर परेल परिसरात भेटले होते का, सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होणार आहे. तर खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांची एसआयटी तपास करत असून एसआयटी पुढील तपास करत आहे.


























































