नगर – चिंता वाढली, अजून सोळा जणांचे नमुने तपासणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 8 व्यक्ती तसेच स्वतःहून समोर आलेल्या 8 व्यक्ती अशा 16 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आठ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर उर्वरित आठ जणांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाखेरीज 19 जण हे निरीक्षणाखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान जो रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित असून त्याला बुथ रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर, इतर तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही त्यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, डॉ. अनिल बोरगे, महानगरपालिकेचे उपायुक्त पवार, डॉ.संदीप सांगळे, डॉ. वीरेंद्र बडदे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जे चार जण दुबईवरून आले होते त्यातील एका जणाचा पॉझिटिव्ह मध्ये समावेश आहे इतर तीन जणांचे नमुने हे निगेटिव्ह आलेले आहेत . त्यामुळे त्यातील 3 जणांना घरी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर घरीच निगराणी ठेवली जाणार आहे. यांच्या संपर्कात जे लोक आलेले होते त्याची माहिती प्रशासनाने घेतली असून एकूण आठ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. पण दुसरीकडे जिल्हा रुग्णालय मध्ये आठ जणांनी स्वतःहून आमच्या रक्ताचे नमुने पाठवा असे सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 16 जणांचे रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असून एक-दोन दिवसांमध्ये त्यांचा अहवाल प्राप्त होईल, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 20 जण निगराणीखाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नगर शहरामध्ये तीस अतिदक्षता विभागांची उभारणी करण्यात आलेली आहे. जे जे परदेशातून लोक आलेले आहेत त्यांची प्रशासनाने माहिती घेतली असून त्यांची संख्या 18 आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दुबई येथून आलेल्या त्या दोन मुलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र ती ज्या शाळेमध्ये जात होती, त्या दोन्ही शाळा बंद करण्याचे निर्देश दिले असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वांनी मोठे कार्यक्रम घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे ते म्हणाले.

दुबईवरून आलेल्या चार जण पैकी एकाला लागण झाली असून त्यांच्याजवळ आलेल्या चार जणांची माहिती प्रशासनाने घेऊन त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत. तसेच त्यांना निगराणीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले. नाट्यगृहे चित्रपटगृहे या संदर्भामध्ये स्वतःहून आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र ज्यांना चित्रपटगृह बंद करायचे आहेत, त्यांनी तसा निर्णय घेतला तर आम्ही तो मान्य करू, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितलं. यात्रा, सण-उत्सव, आठवडे बाजार, अन्य बाबींच्या संदर्भामध्ये या अगोदरच आवाहन केलेले आहे. काही ठिकाणी आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा स्थानिक पातळीवरचा विषय असल्यामुळे याचा निर्णय संबंधित लोकांनी घ्यावा, असे ते म्हणाले

ज्या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या रुग्णाची सात दिवसानंतर पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुन्हा पुणे येथे पाठवणार आहोत, जर रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना ऑब्झर्वेशनसाठी फक्त ठेवले जाणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.