
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. 200 हून अधिक प्रवासी पाच तासांहून अधिक काळ फ्लाइटमध्ये अडकून पडल्याची घटना सोमवारी घडली. विमानात अडकून राहिल्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. या अडकलेल्या प्रवाशांना ना पाणी, ना नाश्ता दिला गेला. रविवार-सोमवारच्या मध्यरात्रीपासून प्रवासी विमानात अडकून होते.
रविवारी मध्यरात्री दिल्ली विमानतळाच्या T-3 येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, थाय एअरवेजचे फ्लाइट क्रमांक-TG-316 मध्यरात्री T-3 वरून उड्डाण करणार होते. विमानात 223 प्रवासी होते. विमान नियोजित वेळेवर उड्डाणासाठी तयार होते. मात्र पायलटने विमानाला टेक ऑफसाठी धावपट्टीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला असता विमानाच्या ब्रेकमध्ये काही समस्या असल्याचे दिसून आली.
उड्डाण करण्यापूर्वी फ्लाइट इंजिनीअरने विमानाची पाहणी करून टेक ऑफसाठी ग्रीन सिग्नल दिला होता. विमान टेक ऑफ करणार त्याआधीच वैमानिकाला विमानाच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्याची चौकशी सुरू झाली होती, मात्र त्याची माहिती फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशांना देण्यात आली नव्हती. पहाटे 3.30 वाजता विमान उड्डाण करणार होते, मात्र पाच तास ते विमान विमानतळावरच उभे होते. अखेर सकाळी 7 वाजता या विमानाने उड्डाण घेतले.


























































