
देशात नोटाबंदीनंतर सरकारने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली. त्यामुळे नकली नोटा आणि काळ्या पैशांना आळा बसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ( एनसीआरबी) आकडेवारीवरून दिसून येत आहे. देशात आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये जास्त नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ‘द हिंदू’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार देशात 2019 मध्ये एकूण 25.39 कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. तर 2018 मध्ये हा आकडा 17.95 कोटी होता. सरकारी आकडेवारीनुसार 2019 मध्ये दोन हजार रुपयांच्या 90566 नकली नोटा जप्त करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक नोटा कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात आल्या होत्या.
देशातील चलनात असलेल्या अनेक नकली नोटांचा वापर रोखणे आणि काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटाबंदी जारी केली होती. त्यावेळी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, नोटाबंदीनंतर चार वर्षांनी देशात नकली नोटा चलनात असल्याचे दिसून आले आहे. तसेच नकली नोटांमध्ये दोन हजाराच्या सर्वाधिक नोटा आहेत.
2019-20 या आर्थिक वर्षात दोन हजारच्या नोटांची छपाई केली नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. तरीही दोन हजाराच्या नकली नोटांची संख्या सर्वाधिक आहे. दोन हजाराच्या नोटांव्यतिरिक्त 71 हजारपेक्षा जास्त 100 रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्या दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून जप्त करण्यात आल्या होत्या. देशभरात नकली नोटांविरोधात मोहीम चालवणाऱ्या एनआयएने 2019 मध्ये याबाबतच्या 14 गुन्ह्यांची नोंद केली होती.तर दोन हजाराच्या 14 हजार नोटा जप्त केल्या होत्या. नकली नोटांचा वापर रोखण्यासाठी एनआयएने विशेष पथकही स्थापन केले आहे.






















































