मोदींचे ‘गगनयान’; परदेश दौऱ्यांचा खर्च 2021 कोटी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशदौऱयाबाबत सतत चर्चा असते. आज चीन तर उद्या अमेरिका असे कपडे बदलावेत तसे परदेशदौरे करण्यावरून त्यांच्यावर विविध स्तरांतून टीकाही होते. त्यांच्या या दौऱयांबाबत आता परराष्ट्र राज्यमंत्र्यांनीच प्रकाश टाकला आहे. गेल्या चार वर्षांत मोदींच्या दौऱयावर तब्बल 2 हजार 21 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

‘यूपीए-2’च्या कार्यकाळात मनोहन सिंह यांच्या परदेशदौऱयाचा खर्च 1346 कोटी इतका होता असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी राज्यसभेत सांगितले. या खर्चाच्या दुप्पट खर्च मोदी यांच्या दौऱयावर झाला आहे.

2015-16 मध्ये सर्वाधिक खर्च
2014-15 मध्ये परदेशदौऱयांसाठी वापरण्यात आलेल्या चार्टर्ड विमानांवर 93.76 कोटी खर्च झाला तर 2015-16 मध्ये हा खर्च 117.89 कोटी रुपये होता. 2016-17 मध्ये 76.27 कोटी तर 2017-18 मध्ये 99.32 कोटी इतका खर्च झाला. यंदाच्या 3 डिसेंबरपर्यंत दौऱयांवर 42.01 कोटी रुपये खर्च झाला.

मोदींच्या दौऱयानंतर परदेशी गुंतवणूक वाढल्याचा दावा
नरेंद्र मोदी यांच्या परदेशदौऱयानंतर हिंदुस्थानात परदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याचा दावा परराष्ट्र राज्यमंत्री सिंह यांनी राज्यसभेत केला. ज्या देशांच्या दौऱयांनंतर हिंदुस्थानात परदेशी गुंतवणूक वाढली त्या 10 देशांबद्दल सिंह यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत म्हणजेच 2014 च्या 2.16 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 2018 मध्ये परदेशी गुंतवणुकीचा आकडा 3.03 लाख कोटींपर्यंत गेल्याचे सिंह यांनी सांगितले.

विविध योजनांच्या प्रचारावर 5246 कोटींची उधळपट्टी
साडेचार वर्षांत मोदी सरकारने सरकारी योजनांच्या प्रचारावर तब्बल 5246 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह यांनी लोकसभेत दिली. सरकारने 2014 पासून 7 डिसेंबर 2018 पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली. यात सर्वाधिक 2313 कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक, ऑडिओ व्हिज्युअल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातींसाठी खर्च केले तर प्रिंट मीडियावरील जाहिरातींसाठी 2282 कोटी रुपये खर्च केले. आऊटडोर पब्लिसिटीसाठी 651 कोटी रुपये खर्च केले. या जाहिरातींचा जनसामान्यांमध्ये काही प्रभाव पडतो की नाही याचे मूल्यमापन करण्याचा सरकारने प्रयत्न केला नाही. दरम्यान, यूपीए सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात योजनांच्या प्रचारावर 5040 कोटी रुपये खर्च केले होते.

  • जून 2014 ते डिसेंबर 2018 पर्यंत परदेशदौऱयांसाठी मोदींच्या चार्टर्ड विमानांवर 429.25 कोटी खर्च आला. हॉटलाइन सुविधांसाठी 9.11 कोटी रुपये खर्च आला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी 55 महिन्यांत 92 देशांचा दौरा केला.