खोणीत कोम्बिंग ऑपरेशन; २४ नायजेरियन ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोणी आणि पलावा सोसायटी परिसरात मानपाडा आणि नवी मुंबई पोलिसांनी आज संयुक्तपणे राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या नायजेरियन नागरिकांपैकी आठ जण हिंदुस्थानमध्ये बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे खोणी परिसरात वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांची एकच पळापळ उडाली.

खोणी परिसरात आज सकाळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मानपाडा आणि नवी मुंबई पोलिस ठाण्यातील सुमारे १५० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांनी विविध इमारती आणि फ्लॅटवर छापेमारी करत १४ पुरुष, ७ महिला तसेच ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

महिलेने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

पोलिसांनी पकडलेल्या नऊ नायजेरियन नागरिकांचा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग आहे. त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. कारवाईदरम्यान एका महिलेने पळून जाण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.