
सामना प्रतिनिधी । पेण
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे स्वछता दूत पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पेण येथील श्री सदस्यांनी 27 हजार वृक्षांची लागवड तालुक्यातील पिंपळगाव, सापोली येथे केली. यावेळी पेणचे आमदार धैर्यशील पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पेणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बापू दळवी, सापोली चे सरपंच लहू पाटील, पेण वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन वनविभाग यांच्या 33 कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत आज पेण तालुक्यातील पिंपळगाव, सापोली येथे आज वनखात्याच्या 25 हेक्टर जागेत 27 हजार 775 वृक्षांची लागवड करण्यात आली.यामध्ये शिवण,आपटा, खैर,शिसव,तुती,करंज,आवळा,कांचन,साग, बांबू,काजू, बावळा, या वृक्षांचा समावेश आहे.आज सकाळ पासून राबविण्यात आलेल्या या उपक्रमा मध्ये पेण तालुक्यातील वाशी नाका ,वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा,दादर,शिर्की, वडखळ,भाल व पेण शहर या सोळा बैठकांतील 1090 श्री सदस्यांनी सहभाग घेतला. याच वृक्ष लागवड योजने अंतर्गत पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी 2017 मध्ये हनुमान पाडा, 2018 मध्ये खारपाडा ग्रामपंचायत हद्दी मध्ये वृक्षारोपण केले होते. या बरोबरच पेण उंबर्डे येथे वनविभागाच्या साडेसात एकर जागेत देखील वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम पेण येथील श्री सदस्य करत आहेत.


























































