
मुंबई पोलिसांनी गेल्या 16 दिवसांत शहरामध्ये ठिकठिकाणी कारवाई करत 267 गुन्हे दाखल करून 276 आरोपींना अटक केली. शिवाय अनधिकृत पानटपरी, फेरीवाले तसेच रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी अपप्रवृत्तीच्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या 16 दिवसांत 336 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करून 13 आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींकडून मोठय़ा प्रमाणात ड्रग्जचा साठा हस्तगत करण्यात आला. याशिवाय ‘कोप्टा’ कायद्यांतर्गत एकूण 7 हजार 797 कारवाया करण्यात आल्या. त्यानुसार 1 हजार 433 अनधिकृत पानटपऱयांचे निष्कासन, 6 हजार 689 रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले आणि तीन हजार सहा रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. अशी कारवाई यापुढेदेखील सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.































































