
सामना ऑनलाईन । मुंबई
‘वाक्यम रसात्मकं काव्यं’- रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात’. असं म्हणत गेली ३८ वर्षे रसपूर्ण काव्यांची ही गंगा अविरतपणे रसिकांसमोर आणण्याचं काम विसुभाऊ बापट यांनी केले आहे. ओंकारसाधना, मुंबई निर्मित ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचे बीज नव्याने रोवले. अनेक प्रस्थापित, नवोदित कवींच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित कवितांचा संच घेऊन तीन दशकांहून अधिक काळ विसुभाऊ बापट ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा एकपात्री कार्यक्रम करत आहेत. एकही कवितेची पुनरुक्ती न करता कविता पाठ करून सलग ११ तास आणि १५ तास कवितांचे सादरीकरण करण्याचा विक्रम विसूभाऊंच्या नावावर आहे.
विसूभाऊंच्या या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. ‘अविरत प्रतिष्ठान’ आणि ‘क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ओमकार साधना, मुंबई निर्मित ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३०००वा महोत्सवी कार्यक्रम रविवारी ६ जानेवारीला रात्री ८.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि औदुंबर आर्टस् या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विसुभाऊ बापट, शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवणार आहेत.
कार्यक्रमासाठी नाट्यगृहाच्या पहिल्या चार रांगा राखीव असून बाल्कनीच्या प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. ३ जानेवारीपासून प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध होतील. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हंटलं जात त्यामुळे वेगवेगळ्या कवींच्या दृष्टीतून हे जग जाणण्यासाठी आणि कवितेच्या या जगाची एक झलक अनुभवण्यासाठी रविवारी ६ जानेवारीला, रात्री ८.०० वाजता, शिवाजी मंदिर येथे ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या कार्यक्रमाच्या ३०००व्या महोत्सवी प्रयोगाला आवर्जून उपस्थित रहा.

























































