
सामना ऑनलाईन, नगर
नगर जिल्ह्यातील 31 चारा छावण्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. चारा छावण्या नियमांचे पालन करतात की नाही हे पाहण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली होती. भरारी पथकांनी केलेल्या पाहणीनंतर हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दंडाची रक्कम 8 लाख 38 हजार 860 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेतल्यानंतर राज्य सरकारने राज्यामध्ये चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. नगर जिल्ह्यामध्ये सध्य़ाच्या घडीला 350 पेक्षा जास्त चारा छावण्या सुरू आहेत. चारा व पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकर्यांनी त्यांचे जवानरे या छावण्यांमध्ये आणली आहेत. या चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि छावण्यांच्या आडून आर्थिक घोटाळे होऊ नयेत यासाठी भरारी पथके नेमण्यात आली होती.
पशुखाद्य वेळेवर आणि माफक दरात दिले जाते का, चारापाणी उपलब्ध आहे का, जनावरांची नोंदवही अद्ययावत आहे का, सीसीटीव्ही लावले आहेत की नाही, कडबाकुट्टी, छावणीत विद्युत तपासणी आहे का या बाबींची तपासणी भरारी पथकाने करणे गरजेचे असते. नगर जिल्ह्यातील 31 चारा छावण्यांमध्ये या बाबींबाबत त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे या चारा छावण्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. श्रीगोंदे तालुक्यातील 8 चारा छावण्यांना 2 लाख 73 हजार 630, जामखेड तालुक्यातील 13 चारा छावण्यांना 3 लाख 32 हजार 770, शेवगाव तालुक्यातील 9 चारा छावण्यांना 2 लाख 20 हजार 810, तर नगर तालुक्यातील एका चारा छावणीला 11 हजार 650 असा एकूण 31 चारा छावण्यांना 8 लाख 38 हजार 860 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
































































