322 कॉलेजमध्ये बायोमेट्रिक गायब, मुंबईतील विद्यार्थ्यांची हजेरी अद्याप कागदावरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
biometric attendance system issue no salary in bmc

सामना प्रतिनिधी । मुंबई

बायोमेट्रिक हजेरीच्या सक्तीचा आदेश मुंबईतील ज्युनियर कॉलेजनी पायदळी तुडवला असून तब्बल 322 कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी कागदावरच होत असल्याचे समोर आले आहे. अकरावी, बारावीला शिकणाऱया सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती बायोमेट्रिकद्वारे घ्यावी, असा शासन अध्यादेश गेल्या वर्षी जारी करण्यात आला होता, पण एकूण 570 कॉलेजपैकी केवळ 248 कॉलेजमध्येच बायोमेट्रिक हजेरी घेतली जात असल्याचे समोर आले आहे.

मुंबई विभागातील दुय्यम दर्जाची कॉलेज आणि नामांकित कोचिंग क्लासेसचे टायअप सुरू आहे. या टायअपमध्ये विद्यार्थी कॉलेजला न जाता पूर्णवेळ कोचिंग क्लासमध्येच लेक्चरला जातात. विद्यार्थ्यांचा कॉलेजशी संबंध केवळ प्रॅक्टिकल परीक्षेपुरताच मर्यादित असतो. कॉलेजमध्ये सुमारे 75 टक्के उपस्थिती सक्तीची असतानाही विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यावर अशा कोचिंग क्लासेसवर अंकुश लावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली, मात्र ही सक्ती करूनही अद्याप निम्म्याहून अधिक कॉलेजमध्ये बायोमेट्रिकचा वापर होत नसल्याचे दिसत आहे.

…तर मान्यता रद्द होईल
ज्युनियर कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयाला देण्यात आल्या असून बायोमेट्रिक हजेरीबाबत उदासीन असणाऱया कॉलेजची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

– 15 जून 2018 मध्ये बायोमेट्रिक हजेरी घेण्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
– मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर येथील विज्ञान शाखेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे.
– शासन आदेश जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत बायोमेट्रिक हजेरी घेणे कॉलेजना बंधनकारक होते.

570 – एकूण कॉलेज (सायन्स शाखा)
248 – बायोमेट्रिक हजेरी घेणारी कॉलेज
322 – बायोमेट्रिक हजेरी नसलेली कॉलेज