पुन्हा कहर; मुंबईत दिवसभरात 3671 कोरोना रुग्ण, दोन्ही डोस घेऊनही 93 जणांना ओमायक्रोन

मुंबईत कोरोनाच्या तिसऱया लाटेचे स्पष्ट संकेत दिसत असून गेल्या 24 तासांत 3671 रुग्ण आढळले आहेत. तर 21 डिसेंबरपासूनच्या जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये ओमायक्रोनच्या 370 चाचण्यांमध्ये 190 रुग्ण ओमायक्रोनबाधित आढळले आहेत. यामुळे मुंबईत एकूण ओमायक्रोनबाधितांची संख्या 327 वर गेली आहे. विशेष म्हणजे आज नोंद झालेल्या 190 ओमायक्रोनबाधितांमध्ये तब्बल 93 जणांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले आहेत.

मुंबईत 21 डिसेंबरपासून आलेल्या सर्व प्रवाशांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. यातील अहवाल आज एकत्रित जाहीर झाल्याने ओमायक्रोनबाधितांची संख्या एकाच दिवसात 190 नोंदवली गेल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ओमायक्रोनच्या वाढत्या संख्येसोबतच कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 779479 वर गेली आहे.

90 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत

मुंबईत आढळणाऱया 90 टक्के कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बाधित आढळणाऱया केवळ 5 टक्के जणांमध्ये सौम्य लक्षणे असून केवळ 5 टक्के जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. शिवाय एकही रुग्ण अत्यवस्थ नसून ऑक्सिजनचीही गरज लागलेली नाही.

एकाच महिन्यात सातव्यांदा शून्य मृत्यू

मुंबईत कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांची संख्या वाढत असली तरी डिसेंबरमध्ये सातव्यांदा एकाच दिवसात शून्य मृत्यू नोंद झाली आहे. याआधी 17 ऑक्टोबर 2021 रोजी रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यू नोंद झाली होती. तर डिसेंबरमध्ये 11, 15, 18, 20, 22 आणि 25 डिसेंबर रोजी शून्य मृत्यू नोंद झाली होती, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.