
सामना प्रतिनिधी । पुणे
सातबारा संगणकीकरण राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महसूल विभागातर्फे डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 39 लाख 24 हजार 648 डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उताऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामात नगर जिल्हा आघाडीवर असून, नगरमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक 5 लाख 5 हजार 594 डिजिटल स्वाक्षरी सातबारा उतारे तयार झाले आहेत, तर पुणे जिल्हा 7व्या क्रमांकावर आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्याचे काम सुरू केले आहे. सातबारा संगणकीकरणात चावडीवाचन, सातबारा दुरुस्ती, पुनर्लेखन, ऑनलाइन सातबारा आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा असे विविध टप्पे केले आहेत. त्यातच संगणकीकरणाच्या प्रक्रियेत नजरचुकीने काही चुका झाल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने राज्यातील सर्व जमीनधारकांना व शेतकऱ्यांना येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत या चुका दुरुस्त करून घेण्याची संधी दिली आहे. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीच्या कामाने अद्यापि वेग घेतला नाही. राज्यात नगर जिल्ह्यापाठोपाठ रायगड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर, तर धाराशीव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्यात 2 लाख 85 हजार 264, धाराशीव 2 लाख 78 हजार 280 एवढे उतारे डिजिटल स्वाक्षरीचे आहेत. पुणे जिल्ह्याने या कामात काहीशी आघाडी घेतली असली तरी आत्तापर्यंत पुण्यातील 2 लाख 12 हजार 283 उतारे स्वाक्षरीयुक्त झाले आहेत.
डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे
नगर 505594, रायगड 285264, धाराशीव 278280, यवतमाळ 276466, अमरावती 239634, नाशिक 234973, पुणे 212283, बुलढाणा 201998, बीड 200087, अकोला 186726, जालना 185792, वाशिम 119431, कोल्हापूर 117227, हिंगोली 107232, सोलापूर 105284, लातूर 90872, गोंदिया 76956, परभणी 59629, भंडारा 56507, ठाणे 54154, वर्धा 53815, जळगाव 48276, नागपूर 47888, सांगली 4000, नंदूरबार 39736, संभाजीनगर 32509, गडचिरोली 31985, चंद्रपूर 25079, धुळे 3995, सातारा 3675, पालघर 3187, नांदेड 107, मुंबई 7, सिंधूदूर्ग 0, रत्नागिरी 0
































































