
स्वस्तातील सुरक्षित आणि वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस मुंबईकरांच्या पसंतीस उतरली असून आणखी चार डबलडेकर बस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. बॅक बे आगार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गेट वे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, उन्हाळी सुट्टी असल्यामुळे मुंबईत पर्यटकांचा ओघ वाढला असून रात्रीच्या हेरिटेज टूरला प्रवाशी पसंती देत आहेत. त्यामुळे बेस्टचा रोजचा महसूल 25 लाखांच्या घरात पोहोचला आहे.
मुंबईत लोकल आणि बेस्ट या मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जातात. वेगवान लोकलला सर्वाधिक पसंती दिली जात असली तरी बेस्टमधूनही हजारो लोक दररोज प्रवास करत असतात. बेस्टच्या ताफ्यात पूर्वीपेक्षा आधुनिक अशा दोन डबलडेकर नुकत्याच दाखल झाल्यामुळे बेस्टची शान वाढली आहे. यात आता आणखी वाढ होणार असून नुकत्याच दाखल झालेल्या चार वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सर्वांत स्वस्त प्रवास म्हणून बेस्ट बसना पसंती दिली जात असून पहिल्या पाच किलोमीटरचा गारेगार प्रवास फक्त सहा रुपयांत करता येतो. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटक या बसेसला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
ऑक्टोबरपर्यंत बसेसची संख्या 200 होणार
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 6 वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर दाखल झाल्या असून वर्षाअखेरीपर्यंत साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत 194 एसी डबलडेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
दोन कोटींची बस 90 प्रवासी क्षमता!
बसची ऑपरेशनल क्षमता 180 कि.मी. आहे. 45 मिनिटांच्या चार्ंजगमध्ये बस 100 कि.मी.पर्यंत धावू शकते, तर संपूर्ण चार्जसाठी 80 मिनिटे लागतात. या बसची बॉडी अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे. या एका बसची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. यातून जवळपास 90 प्रवाशी प्रवास करू शकतात.
उर्वरित 700 बसेसपुढे पेच, नव्याने निविदा
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 900 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यापैकी 200 एसी डबलडेकर बसेस स्विच मोबॅलिटी पंपनीकडून खरेदी केल्या जाणार असून 6 बस बेस्टकडे दाखल झाल्या आहेत. मात्र तांत्रिक कारण पुढे करत उर्वरित 700 बसचा पुरवठा करणाऱया पंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे बेस्टने तीन वेळा नव्याने निविदा मागवल्या आहेत. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे 700 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसच्या मार्गात मोठी अडचण निर्माण झाली आहे.


























































