
47व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत तामीळनाडूच्या खेळाडूंनी बाजी मारली. 18 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अंतिम सामन्यात तामीळनाडूच्या के. नवीनकुमारने त्याचाच सहकारी अब्दुर रहीमचा (तामीळनाडू) पहिला सेट 11-17 असा हरल्यानंतरही दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये 14-10, 14-6 असा जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले. तर 18 वर्षांखालील जुनिअर गटात मुलींच्या एकेरीत अंतिम फेरीत तामीळनाडूच्या एम. खाझिमाने बिहारच्या शालू कुमारीला 20-5, 12-11 असे सहज पराभूत करून अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
21 वर्षांखालील मुलांच्या युथ एकेरी गटात अंतिम सामन्यात विदर्भच्या गुरुचरण तांबेने महाराष्ट्राच्या दुष्यन्त गुप्ताला 21-5, 19-10 असे पराभूत करून बाजी मारली. तर 21 वर्षांखालील मुलींमध्ये युथ एकेरी गटात अंतिम फेरीत एअरपोर्ट अथॉरिटीच्या मंथाशा इक्बालने कर्नाटकच्या एस. शायनीला 13-7, 13-10 असे हरवून अंतिम विजेतेपद पटकावले.


























































