संघाच्या ‘डेंजर झोन’ यादीत महाराष्ट्रातील भाजपच्या ५ खासदारांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

२०१९च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्षांकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकप्रतिनिधींच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी एक सर्वेक्षण केल्याचं बोललं जात आहे. या सर्वेक्षणाअंती अत्यंत वाईट कामगिरी असणाऱ्या आणि पराभवाची दाट शक्यता असलेल्या ४५ खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश असून त्यात भिवंडीचे खासदार कपिल पाटील, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, लातूरचे खासदार सुनील गायकवाड ही नावे समाविष्ट आहेत.

संघाच्या म्हणण्यानुसार, पाटील आणि बनसोडे हे अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. भाजपने त्यांना खासदारकी दिली होती, परंतु निवडून आल्यानंतर ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संपर्कात राहिले नाहीत आणि त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये पक्षाची वाढ करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तर गायकवाड देखील पक्षाला जास्त योगदान देण्यास अपयशी ठरले आहेत.

संघाचे सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी अशी कोणतीही यादी केल्याचं नाकारलं आहे. वैद्य यांच्या म्हणण्यानुसार या बैठकीत पक्षाच्या अंतर्गत समस्यांचा आढावा घेतला गेला. तसेच संघ आणि भाजप यांमधला राजकीय समन्वय साधण्याबद्दलही चर्चा झाली. अशा बैठकी नियमितपणे होत असतात. त्यांचा निवडणुकीशी संबंध जोडू नये.” असं वैद्य यांनी म्हटलं आहे.