
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाचा दणदणीत पराभव करून सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सत्तेचा नवा पॅटर्न आणला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला राज्याच्या मंत्रिमंडळात एक-दोन नाही तर तब्बल पाच उपमुख्यमंत्री नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकारण म्हटल की, मंत्रीपदावरून आमदारांमध्ये असणारी नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागते. सत्तासमतोल राखण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग अनेक राज्यांत आजवर करण्यात आला. चंद्राबाबू नायडू यांनी मागासवर्गीय व कप्पू समाजाला प्रतिनिधित्क म्हणून दोन उपमुख्यमंत्री नेमले होते. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारमध्येही काही काळ दोन उपमुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या कायएसआर काँग्रेसने तर पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
कायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. एएसी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कप्पू समाजातील एका आमदाराला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. जगनमोहन सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आज शनिवारी होणार असून 25 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


























































