हिरे बाजारातील घोटाळा ५० हजार कोटींचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिरे बाजारात जी पैशांची अफरातफर सुरू आहे तो घपला तब्बल ५० हजार कोटींचा असल्याचे हिरेतज्ञांनी म्हटले आहे. अनेक व्यापारी स्वस्त माल जाणूनबुजून महागडय़ा दरात खरेदी करून अब्जावधी रुपयांचा पैसा परदेशात पाठवत असून त्यामुळे देशाला हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे मत हिरेतज्ञांनी व्यक्त केले आहे. हिंदुस्थानातील हिरेबाजारात मोठय़ा प्रमाणावर पैशांची अफरातफर होत असून हिरे बाजारात भीतीचे वातावरण आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्शी यांसारख्या हिरे व्यापाऱयांनी देशाचे हजारो कोटी रुपये बुडवले आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल हिरेतज्ञ हार्दिक हुंडीया यांनी केला आहे. सरकार हिरे व्यापाऱ्यांना त्यांचा धंदा वाढावा आणि सरकारला मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळावा यासाठी कर्ज देते. त्याचा गैरफायदा हिरे व्यापारी घेत असून अनेकांनी कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. त्याचा प्रचंड मोठा फटका हिरे बाजाराला बसला असून त्याचा परिणाम रोजगारावरही झाला आहे. हिऱयांची अवाचेसवा किंमत ठेवणाऱया व्यापाऱ्यांची धरपकड झाल्यामुळे सध्या इम्पोर्टेड हिऱ्यांची किंमत ठरवण्यासाठी कुणीही पुढे येत नसून जयपूरमध्येही हिऱ्यांची आयात बंद करण्यात आली आहे. परिणामी हिरे बाजारातील घपला तब्बल ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता हुंडीया यांनी वर्तवली आहे.

ऑपेरा हाऊसमधील हिरे व्यापार डबघाईला

हिरे व्यापार जेव्हा तेजीत होता तेव्हा ऑपेरा हाऊसमध्ये तब्बल ६ हजारच्या जवळपास हिऱयांची ऑफिसेस होती; परंतु हिंदुस्थानातील हिरे व्यापार धोक्यात आल्यापासून ऑफिसेसची संख्या २,५०० पर्यंत खाली आल्याचे हुंडीया यांनी म्हटले आहे. दरम्यान, हिरे बाजारातील सर्वात मोठ्या घोटाळय़ाचा तपास योग्य पद्धतीने केल्यास हिरे बाजारातील अनेक रहस्ये उघड होऊ शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.