
काळी जादू आणि तंत्रविद्येकरिता वाघाचे कातडे, नखं यांची तस्करी केली जाते, अंधश्रद्धेपोटी लोकं काहीही करू शकतात. गळ्यात ताईत घालण्याकरिता वाघांच्या मिशीचे केस कापल्याचे ताजे उदाहरण समोर आले आहे.
राजस्थानातील रणथंभोर आणि सरिस्का या अभयारण्यातील वाघांच्या मिशा उपटून काढण्याची घटना घडली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून या अभयारण्यातील 6 वाघ बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गळ्यातील ताईतमध्ये वाघांच्या केसांचा वापर करण्यासाठी येथील काही जणांनी वाघांच्या मिशीचे केस कापून घेतले असल्याची माहिती उघड झाली आहे.
या घटनेबाबत सरिस्का येथील वाघ एसटी-6 चे मिशीवरील केस कापण्यात आले. 10 जानेवारी रोजी या वाघाला उपचारार्थ नेण्यात आले होते. तेव्हा अधिकाऱ्यांच्या समोरच ही घटना घडली होती तसेच त्यावेळी रेंजर आणि काही डॉक्टरही उपस्थित होते, अशी तक्रार येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली आहे. या तक्रारीबाबत सरिस्का वाघ प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, उपचारासाठी आणण्यात आलेल्या वाघाचे वय 15 वर्षे आहे. या वयात वाघांचे केस गळू शकतात. तसेच वाघांच्या एकमेकांशी झालेल्या लढतीमुळेही त्यांचे केस गळू शकतात.
वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार, कोणत्याही वन्य प्राण्यांच्या शिकार करून त्याची नखे, दात, केस या अवयवाची तस्करी करणे हा अपराध आहे. त्यामुळे अभयारण्यातून वाघ बेपत्ता होणे आणि त्यांच्या मिशीवरील केस काढून घेणे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.






















































