
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
देशात बेरोजगारीने कळस गाठला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बेकारीचा दर 7.2 टक्क्यांवर गेला असून, गेल्या 28 महिन्यांतील हा उच्चांक आहे. धक्कादायक म्हणजे, एका वर्षभरात तब्बल 60 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात देशातील बेरोजगारीचे भयंकर वास्तव समोर आले आहे. नवीन रोजगार निर्माण होण्याऐवजी आहेत त्या नोकऱ्या कमी होत आहेत.
काय आहे ‘सीएमआयई’चा अहवाल?
- फेब्रुवारी 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्क्यांवर गेला. सप्टेंबर 2016 नंतर गेल्या 28 वर्षांतील हा बेकारीचा सर्वाधिक दर आहे.
- फेब्रुवारी 2018 मध्ये देशात 40.60 कोटी लोक नोकऱ्या करीत होते. फेब्रुवारी 2019 मध्ये ही संख्या 40 कोटी झाली. म्हणजे एका वर्षात तब्बल 60 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
- लेबर पार्टिसिपेशन रेट (श्रम भागीदारी दर) यामध्ये प्रतिमहिना घट होत आहे. जानेवारी 2019 मध्ये हा दर 43.2 टक्के होता. फेब्रुवारीत 42.7 टक्के झाला आहे.
सांख्यिकी आयोगाने काय म्हटले होते?
दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने आपल्या अहवालात देशात बेरोजगारीने 45 वर्षांतील उच्चांक गाठल्याचे म्हटले होते. नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका बसल्यामुळे फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आयोगाचा अहवाल सरकारकडून जाहीर होत नसल्याने आयोगाचे चेअरमन पी. सी. मोहनन आणि सदस्य जे. व्ही. मीनाक्षी यांनी राजीनामा दिला होता.

























































