600 कोटींच्या घोटाळय़ाप्रकरणी भाजप नेते जनार्दन रेड्डी यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,बंगळुरू

सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्झी इन्व्हेसमेंट घोटाळ्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना बंगळुरू पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे.  मनी लाँडरिंग प्रकरणातील मुख्य आरोपीला अवैध पद्धतीने पैशांच्या अफरातफरीत मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.  रेड्डी यांना 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

रेड्डी यांच्या अटकेची पूर्वतयारी सुरू असतानाच शनिवारी रेड्डी हे स्वतःहून गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ठोस पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे रेड्डी यांना अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी अलोककुमार यांनी सांगितले. या प्रकरणातील पैसे जप्त केल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात येतील असे सांगण्यात आले. तसेच जनार्दन रेड्डी यांचा एक सहकारी महफूज अली खान यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची अतिशय बारकाईने तपास करण्यात प्रसिद्ध असलेल्या डीसीपी एस गिरीश यांच्या बदलीसाठी जनार्दन रेड्डी प्रयत्न करीत हेते, पण त्यापूर्वीच त्यांना अटक झाली आहे.