राज्य नाट्य स्पर्धेत सावरकरप्रेंमींचा गोंधळ, ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ नाटकावेळी राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकामध्ये संबंधित दिग्दर्शक व कलाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चुकीचा इतिहास मांडला. त्याचे तीव्र पडसाद नाट्यसभागृहात उमटले. सावरकर प्रेमींनी नाटक तात्काळ बंद करा, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, व त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या सावरकर प्रेमींनी तोफखाना ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी निर्णय घेतला.

61व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आजपासून नगर केंद्रावर सुरू झाली. ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक पहिल्या दिवशी सादर झाले. मात्र, या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमी चांगलेच चिडले. त्यामुळे नाटक अंतिम टप्प्यात असतानाच सावरकर प्रेमींनी सभागृहात उभे राहून, ‘हे नाटक बंद करा’अशी घोषणाबाजी केली. तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असून अशा नाटकाचे प्रयोग राज्यात पुन्हा कुठेही होऊ देणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानने आज राज्य नाट्य स्पर्धेत ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक सादर केले. मात्र या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला. या नाटकांमध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने गांधी हत्या केल्याचा नथुराम गोडसे यांना पश्चाताप झाला आणि यासाठी सावरकर ही दोषी होते,असे दाखवण्याचा प्रयत्न केला. याला सावरकरप्रेमींनी आक्षेप घेतला.

नाटकाचा शेवटचा अंक सुरू असताना सभागृहातील एका गटाने उभा राहून तत्काळ नाटक बंद करा, अशी मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत, हे नाटक सादर करणारे कलाकारांचा दिग्दर्शकांचा व स्पर्धेच्या आयोजकांचे निषेध केला. काही ज्येष्ठ रंगकर्मी यांनी देखील या नाटकात चुकीचा इतिहास दाखवले असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्यावरही दोन रंगकर्मीच्या गटांमध्येही बाचाबाची झाली. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल आले. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडला.

राज्य नाट्य स्पर्धा ही राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून घेण्यात येते. या स्पर्धेत येणाऱ्या नाटकाची स्क्रिप्ट सेन्सर कडून मंजूर होऊन येते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने नाव घेणाऱ्या राज्यातील सरकारने, ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाला परवानगी दिलीच कशी ? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला. तसेच सेन्सर बोर्ड ही नेमके कशा पद्धतीने काम करतय व त्याच्यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही, अशा भावनाही सावरकर प्रेमी व्यक्त केल्या.