काँग्रेसच्या तातडीच्या बैठकीला 45 पैकी 7 आमदार गैरहजर

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारदेखील भाजपच्या गळाला लागले असल्याच्या चर्चेनंतर काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक आज बोलवली होती. त्या बैठकीला 45 पैकी 7 आमदार गैरहजर होते. या आमदारांनी वैयक्तिक कारणास्तव बैठकीला उपस्थित राहता येणार नाही अशी पूर्वसूचना दिली होती, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.

विधान भवनातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात ही बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण समर्थक मोहन हंबरडे, माधव जवळगेकर आणि जितेश अंतापूरकर अनुपस्थित होते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. याबरोबरच अमित देशमुख, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे आणि सुलभा खोडके हे चार आमदारही बैठकीला गैरहजर होते.

खासगी कारणास्तव आमदार अनुपस्थित
काँग्रेस आमदारांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. राज्यसभेचे अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचे लोणावळा येथे होणाऱया दोन दिवसीय शिबिरासाठी सर्व आमदार जाणार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. अनुपस्थित राहणाऱया आमदारांनी न येण्याबाबतची कारणे आम्हाला कळवली आहेत आणि त्यांच्याशी आपले आणि बाळासाहेब थोरात यांचे बोलणे झाले आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.