‘बेस्ट’मध्ये वर्षभरात 700 डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करार करूनही गाडय़ांचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱया ‘कौसिस’ पंपनीला नोटीस बजावल्यानंतर प्रशासनाने आता कारवाईचा निर्वाणीचा इशारा दिल्याने या कंपनीने वर्षभरात 700 डबलडेकर इलेक्ट्रिक गाडय़ा पुरवण्याचे मान्य केले आहे. यामुळे ‘बेस्ट’च्या गाडय़ांचा ताफा 6 हजारांवर जाणार आहे.

‘बेस्ट’मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. एकेकाळी ‘बेस्ट’ बसेसची संख्या स्वतःच्या 5 हजार बसेसची संख्या आता 2978 वर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बसेसचाही समावेश आहे. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांवर आली आहे, मात्र आता प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुविधेसाठी 2027 पर्यंत गाडय़ांचा ताफा 10 हजारांवर नेण्यात येणार आहे. यामध्ये गाडय़ा पुरवण्यास टाळाटाळ करणाऱया ‘कौसिस’ कंपनीला नोटीसही बजावली होती. यानंतर आता निर्वाणीचा इशारा देत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने आता वर्षभरात झालेल्या करारानुसार गाडय़ा पुरवण्याची तयारी दर्शवली.

अशी आहे सद्यस्थिती
‘बेस्ट’ला स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस अशा दोन कंपन्या एकूण 900 एसी डबलडेकर बसेस पुरवणार आहेत. यामध्ये स्विच मोबॅलिटी पंपनी 200 तर कॉसिस कंपनी 700 बसेसचा पुरवठा करणार आहे. यापैकी स्विच मोबॅलिटी कंपनीने बसेसचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असून 47 डबलडेकर बसेसचा पुरवठा केला असून उर्वरित बसेसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार आहे, मात्र कॉसिस कंपनी अद्याप एकही बस दिली नसून वारंवार स्मरणपत्र देऊनही दुर्लक्ष केले जात होते.