
सामना प्रतिनिधी । मुंबई
नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.
पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी
ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर 387 तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक 230 तक्रारी ह्या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरण 44, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण 7, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप 22, मद्याचे वाटप 18, पैशाचे वाटप 38, पेड न्यूज 41, धार्मिक किंवा सामाजिक भाषण 3, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक 5, निर्धारीत वेळेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर 5 तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत 19 तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या.
ॲपच्या सहाय्याने सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्या खालोखाल ठाणे 68, सोलापूर 61, मुंबई उपनगर 45 तर मुंबई शहर येथे 41 तक्रारी दाखल झाल्या आहेत.




























































