नगरवासियांनी केलेला सत्कार मला साहित्य संमेलन अध्यक्षपदापेक्षाही मोलाचा – डॉ. आ. ह. साळुंके.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगरवासियांनी अमृतमहोत्सवानिमित्त केलेला माझा सन्मान मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदापेक्षाही मोठा वाटतो. या सत्काराने मी धन्य झालो, नेमके काय बोलावं असा प्रश्न मला पडला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ख्यातनाम विचारवंत व पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंके यांनी केले.

येथील कोहिनुर मंगल कार्यालयात आयोजित डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. भी. ना. दहातोंडे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य खासेराव शितोळे, उत्तमराव पाटील, प्रा. अर्जुन जाधव, सत्यभामाआक्का तनपुरे, शशिकला दहातोंडे, स्वागताध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव देवढे, इंजिनिअर तुकराम मचे, कॉ. बाबा आरगडे आदी विचारपीठावर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना डॉ. साळुंखे पुढे म्हणाले की, नगरला मी खूप वेळा आलो, नगरकरांनी मला भरभरून प्रेम दिले. प्रस्थापितांकडून मिळालेला रत्नहार स्विकारण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांची पायधूळ मला अधिक प्रिय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कधी मी श्रोता म्हणून देखील गेलो नाही कारण माझी ती वाट नाही. ते मला बोलावणार नाहीत आणि मीही जाणार नाही. आपण अतिशय जिव्हाळ्याने व आत्मीयतेने आमचा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे आम्ही घेतलेल्या विशिष्ट भूमीकेचा, विचारधारेचा व जीवन शैलीचा सत्कार आहे, असे मी मानतो. मी स्वतः अत्यंत तृप्त व समाधानी आहे. कोणत्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करावी हे मला समजत नाही.

स्वातंत्र्याचे भय आजही निर्माण झाले. स्वातंत्र्य जपणे हे बोलायला सोपे आहे, मात्र आचरणात आणणे अतिशय अवघड काम आहे. जी गोष्ट अधिक मौल्यवान असते तिची किंमत मोजणे अवघड असते. चार्वाकचे तत्वज्ञान वाचल्यानंतर माझे अख्खे आयुष्य बदलून गेले. माझ्या धडावर माझेच शीर असावे ही भूमिका मी ठामपणे मांडली. समाजाच्या हितासाठी जे आवश्यक आहे. ते लोकांसमोर ठेवले. बुद्धांना आपण समजून घेतले नाही ही आपली सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपली बुद्धी आणि विवेक वापरा असं तत्वज्ञान त्यांनी सांगितले. चिकित्सा करण्याचा सल्ला दिला. कारण चिकित्सा हा विज्ञानाचा पाया आहे.

इथं माणसा-माणसात फूट पाडली गेली. भावी पिढीच्या ओठावर हास्य राहील कि नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी चक्रधर स्वामी, संत कबीर यांचे तत्वज्ञान सांगितले. आपल्याला खोटा इतिहास जाणीवपूर्वक सांगितला गेला. बहुजन वर्गातील झलकारी बाई सारख्या पराक्रमी महिलेचे कार्य जाणीवपूर्वक लोकांसमोर येऊ दिले नाही. माझी सगळी मांडणी जाती अंतासाठीच असून दीर्घकाळ काम करायचे असेल तर वास्तवाला भिडले पाहिजे. जातीअंत ही लादून होणारी गोष्ट नाही त्यासाठी समतेची मूल्ये मनामध्ये रुजविण्याचे काम केले पाहिजे. मात्र हे काम केवळ मूल्यांनी होणार नाही तर परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेऊन प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. असे सांगून सर्व परिवर्तनवादी चळवळींनी शोषणाच्या विरुद्ध उभे राहून ऐरणीवरचे प्रश्न मांडले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. भि. ना. दहातोंडे म्हणाले की, माझ्या या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यामुळे माझे शब्द जणू मुके झाले आहेत. मी धन्य झालो आहे, हे समाज ऋण कसे फेडावे अन कृतज्ञता कशी व्यक्त करावी असा माझ्या समोर प्रश्न पडला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ग्रंथासाठी निधी मिळविण्यासाठी झालेली ससेहोलपट त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

जेष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, डॉ. आ. ह.साळुंखे हे माणसांना विचार करायला शिकविणारे मोठे विचारवंत आहेत. आपला खरा वारसा आणि आरसा दाखवण्याचे काम साळुंखे सरांनी केले आहे. आधिष्ठानावर हा देश उभा आहे. या देशाची संस्कृती तुमची आणि आमची आहे. ती तुम्ही आणि आम्हीच टिकवली आहे. असे सांगून सध्या माणसं शहाणी खूप झाली आहेत त्यामुळे त्यांचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मग ते शहा असो किंवा शहाणे असोत. इथे प्रतीके बदलून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे सांस्कृतिक संदर्भांची फेरमांडणी केली पाहिजे. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि तुकारामांची फेरमांडणी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रेरणा श्रोत आहेत, हे सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुलेंनी सांगितले. जेव्हा व्यवस्था अविचाराचे राजकारण करते तेव्हा विचारांच्या क्षेत्रातील कंत्राटदार तयार होतात. अनेकदा सर्वसामान्य माणसांचे विचार करण्याचे राजकारण असते. आपण बोलले पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले. साळुंखे सरांना खऱ्या अर्थाने सध्याचा भवताल कळला आहे. आपण शाहू, फुले, आंबेडकर चळवळ पुरुषसत्ताक बनवली आहे. आता आपली लढाई मूलभूत परिवर्तनाची आहे. ज्या जातींमध्ये महिलांना स्थान नाही त्या जातील अभ्युदयाची अपेक्षा नाही. जाती अंताच्या नावाखाली आपण जातीयवाद तर तयार करत नाहीत ना हे तपासणे गरजेचे आहे. विचार किती मोठा आहे हे तुम्हा आम्हाला कळत नाही मात्र मारेकऱ्यांना कळतो म्हणूनच डॉ . दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या होते. विचार आणि कृती यामध्ये अद्वैत आहे. इथल्या माणसांना विचार करायला शिकवणे हि खूप मोठी गोष्ट डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केली. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा एक कृतिशील विचारवंत अशी त्यांची प्रतिमा आहे, असे ते म्हणाले.

ह. भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, डॉ. आ.ह. साळुंखे यांनी लिहलेला विद्रोही तुकाराम हा एकच ग्रंथ तुम्ही वाचलात तरी तुमच्या बरोबर सगळ्यांचे कल्याण होईल. महात्मा फुले, राजर्षी शाहू, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरच श्री संत गाडगेबाबांची भूमिका श्री संत नामदेवानंतर जर कोणी पुढे नेली असेल तर ती राष्ट्रसंत तनपुरे बाबांनी नेली. भारत हा विचारप्रधान देश आहे. आणी विचारांचे दोन महापुरुष आज आमच्यात उपस्थित आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

यावेळी डॉ. सर्जेराव निमसे यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते मानपत्र, शाल व पूष्पगुच्छ देऊन डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. भि. ना. दहातोंडे यांच्या सत्कार करण्यात आला. डॉ.मेहबूब सय्यद यांनी डॉ. भि. ना. दाहतोंडे यांच्या मानतत्राचे तर पत्रकार सुधीर लंके यांनी डॉ.आ.ह. साळुंखे यांच्या मानपत्राचे वाचन केले. डॉ.भि.ना. दहातोंडे यांना ७५ हजार रुपयांची थैली देण्यात आली. रेहमत सुलतान फौंडेशन व जिज्ञासा अकादमीच्या संयुक्त विद्यमाने संचालित डॉ. आ.ह. साळुंके यांच्या समग्र साहित्याचे मोफत संदर्भ सेवा वाचनालयाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संयोजन समितीच्या वतीने दरवर्षी पुरोगामी चळवळीतील एका विचारवंतांचा सत्कार केला जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. विठ्ठल बुलबुले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय करून दिला. कॉ. स्मिता पानसरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कॉ. बाबा आरगडे, बापूसाहेब भोसले, आर्किटेक्चर अर्षद शेख, कॉ.सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, सुभाष सोनावणे, डॉ. अशोक कानडे, प्रा.सीताराम कानडे, संजीव भोर, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी बाबासाहेब खराडे यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बाळासाहेब देवढे, राहुल पाटोळे, राजेंद्र पवार, तुकाराम मचे, दिगंबर भोसले, युनूस तांबटकर, सायाराम बानकर, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, संध्या मेढे, राजेंद्र पाचे, पत्रकार समीर दाणी, प्रा. उद्धव उगले, छायाचित्रकार संजय वाघ, प्रा. सॅम्युअल वाघमारे, सुनिल गोसावी, भगवान राऊत, राजेंद्र पवार, रिजवाण शेख, शिवाजी नाईकवाडी, विवेक पवार, रवींद्र सातपुते, सतीश सातपुते, संदीप मचे यांनी परिश्रम घेतले.