एक कोटी लसी पुरवण्यासाठी आठ कंपन्यांचा पुढाकार; महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला 1 जूनपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने एक कोटी कोरोना लस पुरवठय़ासाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या आठमधील सहा कंपन्यांनी स्पुटनिक फाईव्ह व एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट तर एका झेक कंपनीने अस्ट्राझेनका/फायझर या लसींचा पुरवठा करण्यात स्वारस्य दाखविले आहे. पुरवठादारांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने 1 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

डोसच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. त्यामुळे सर्व मुंबईकरांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेने 12 मे रोजी कोरोना लस पुरवठय़ासाठी ग्लोबल टेंडर काढले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील मुंबईसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे निर्देश दिले होते. पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी लस पुरवठय़ासाठी आवश्यक कार्यवाही करीत आहेत.

…म्हणूनच दिली मुदतवाढ

लस पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने जागतिक स्तरावर दिनांक 12 मे रोजी टेंडर काढले. याला 24 मेपर्यंत पाच पुरवठादार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. 25 मेपर्यंत शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी आणखी तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याने एकूण आठ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.

नवीन आलेल्या कंपन्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यांना 1 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. तसेच आणखी कोणाला प्रस्ताव सादर करावयाचा असल्यास संपूर्ण कागदपत्रांसोबतच प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

चार पातळ्यांवर होणार प्रस्तावांची पडताळणी

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादन करीत असलेल्या कंपन्या या दोन्हीं दरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल याची खात्री पटण्यासाठी आणि नेमक्या किती दिवसात लस पुरवठा होईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या 4 मुख्य पैलूंचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.