देशाचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांच्या पार, दिवसभरात 93 हजार 356 जणांना डिस्चार्ज

देशात सलग तिसऱ्य़ा दिवशी 90 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांच्या पार गेला असून हा जागतिक उच्चांक असल्याचे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

देशभरात गेल्या 24 तासांत 93 हजार 356 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 44 लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. आतापर्यंत 43 लाख 96  हजार 399 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 86 हजार 961 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

देशात कोरोनाचे 86,961 नवीन रुग्ण

देशात रविवारी दिवसभरात कोरोनाचे 86,961 नवीन रुग्ण आढळले, तर 1130 जणांचा महामारीत मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54 लाखांवर गेली आहे. तसेच कोरोनाबळींचा आकडा 87,882 वर पोहोचला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 44 लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचे वेळीच निदान करण्यासाठी देशभर चाचण्यांचे प्रमाण वाढवले गेले आहे. रविवारी एका दिवसात 7 लाख 31 हजार 534 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत तब्बल 6 कोटी 43 लाख 92 हजार 594 कोरोना चाचण्या केल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे.

तबलिगीच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला, राज्यसभेत केंद्रीय गृह मंत्रालयाचे स्पष्टीकरण

दिल्लीतील निझामुद्दीन भागात मार्च महिन्यांत तबलिगी जमातने धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने लोक एकत्र आले होते, त्यामुळे हा मेळावा देशात अनेकांमध्ये कोरोना  विषाणूच्या संसर्गाचे कारण ठरला आहे, असे स्पष्टीकरण  केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिले.  ‘दिल्ली पोलिसांनी कोरोनाचा प्रसार केल्याच्या आरोपाखाली तबलिगी जमातच्या  233 सदस्यांना अटक केली आणि 29 मार्चपर्यंत 2,361 लोकांना संघटनेच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आले. तर तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना मोहम्मद साद याची सध्या चौकशी सुरु आहे,असे लेखी उत्तर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या