81 टक्के विद्यार्थी शाळेत जाण्यास आनंदी; ब्रेन लीच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरविणारे विद्यार्थी शाळेत जाण्यास आनंदी आहेत. 81.4 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत परत येण्याबद्दल सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले आहे. ब्रेन ली या ऑनलाइन लार्निंग प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्रेन लीने माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकतेच एक सर्वेक्षण केले. यात शाळेत परतण्याविषयी विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली.

67 टक्के विद्यार्थ्यांनी वर्गात परतल्यावर उत्साह व्यक्त केला. तर वर्गमित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटण्याच्या कल्पनेने 56.4 टक्के विद्यार्थी आनंदीत दिसले. असे असले तरी ऑनलाइन शिक्षण ही काळाची गरज असून कोरोना काळात समोर आलेले ऑनलाइन शिक्षणाचे नवे मॉडेल यापुढेही अस्तित्वात राहतील, असे ब्रेनलीने स्पष्ट केले. ब्रेनलीचे व्यवस्थापकीय संचालक नरसिंह जयकुमार यांनी या सर्वेक्षणाच्या निकालांवर बोलताना सांगितले, ‘‘कोरोना काळात शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे; पण आता शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी शैक्षणिक काटेकोरपणा आणि प्रेरणा प्राप्त करणे हे खरे आव्हान आहे.’’ म्हणूनच ब्रेन लीने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आणि बदलत्या लँडस्केपवर त्यांच्या भावना समजून घेण्याचा निर्णय घेतला.

27.1 टक्के विद्यार्थ्यांनी गणित हा त्यांचा सर्वात आवडता विषय निवडला आहे, तर 39.3 टक्के विद्यार्थ्यांनी हा सर्वात आव्हानात्मक विषय असल्याचे म्हटले आहे. 26.7 टक्के मते मिळवणारा इंग्रजी हा दुसऱया क्रमांकाचा सर्वात आवडता विषय आहे आणि त्यानंतर विज्ञान 24.3 टक्के होते.