
दिल्ली आणि मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये हादरवून सोडण्याचा एक मोठा दहशतवादी कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नऊ हस्तकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकार्यांनी शनिवारी दिली.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ही धडक कारवाई केली असून अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर देशातील अणुकेंद्रे, प्रमुख विमानतळ आणि रेल्वे स्थानके, वीज निर्मिती केंद्र, सुरक्षा दलांचे जवान आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये होती. या संवेदनशील ठिकाणांवर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची जबाबदारी या मॉड्यूलला देण्यात आली होती.
अटक करण्यात आलेले हे मॉड्यूल गेल्या काही काळापासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. त्यांच्यावर पाळत ठेवून शनिवारी ही मोठी कारवाई करण्यात आली. आता पोलीस या आरोपींचे सीमापार असलेले संबंध, टेरर फंडिंग आणि या संपूर्ण कटामागे परदेशात बसून सूत्रे हलवणाऱ्या मुख्य हँडलर्सचा शोध घेत आहेत. या कारवाईची सविस्तर माहिती देण्यासाठी दिल्ली पोलीस आज दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
Special Cell NDR has arrested 9 accused working at the behest of Pak ISI-Mumbai Underworld network. They were tasked to attack vital installations and security personnel in Delhi. Arms and explosives have been recovered from their possession: Delhi Police Special Cell
— ANI (@ANI) May 30, 2026
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीलाच सुरक्षा यंत्रणांना काही इनपुट्स मिळाले होते. त्यानुसार मध्य दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख कार्यालयांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्ले, वाहनांमध्ये आयईडी स्फोटके ठेवून घडवून आणले जाणारे स्फोट किंवा अंदाधुंद गोळीबार यांसारख्या समन्वित हल्ल्यांचा कट रचला जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व जिल्हा पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याचे आणि केंद्रीय निमलष्करी दलांशी समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


























































