
श्रीरंग खरे/विशाल अहिरराव
नाशिकमध्ये 94 व्या साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून म्हणजेच 3 डिसेंबर 2021 पासून सुरूवात झाली. संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास सुरू झाला. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील आणि अन्य मान्यवरांची भाषणे झाली. ही भाषणे सुरू असताना सभामंडपातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सभामंडपाचे दोन हिस्से करण्यात आले होते. यातला पहिला हिस्सा हा मान्यवरांसाठी,आमंत्रितांसाठी आणि सर्वसामान्य साहित्यप्रेमींसाठी ठेवण्यात आला होता. दुसरा हिस्सा हा पूर्णपणे साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा दुसरा हिस्सा जवळपास रिकामा होता. या भागात हातावर मोजता येतील इतक्याच खुर्च्या भरल्या होत्या. दुसऱ्या हिश्श्यामध्ये लोकांना भाषणं नीट दिसावीत यासाठी एलईडी स्क्रीन आणि स्पीकरही लावले होते, मात्र तरीही तिथल्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला हजेरी लावली नाही. त्यांच्याच प्रमाणे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला हजेरी लावली नव्हती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. यामुळे तेही संमेलनाला येऊ शकले नाहीत. या तिघांच्या गैरहजेरीमुळे संमेलनाला येणाऱ्यांची संख्या कमी दिसत होती.
साहित्य संमेलन पाहायला मजा आली, पण लांबलचक भाषणांमध्ये मजा नाही. बरीच मोठी भाषणं असल्याने फारवेळ थांबलो नाही.
– मुकेश समिंद्रे, नाशिकचे रहिवासी
भाषणं ऐकली, मात्र वेळेच्या कमतरतेमुळे सगळी ऐकणं शक्य नव्हतं. शक्य तितक्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट दिली. खासकरून सुधा मुर्तींची पुस्तके आणि सकारात्मक विचार मांडणाऱ्या पुस्तकांची खरेदी केली.
– स्नेहल वाघमारे, हरयाणा
संमेलनाचं आयोजन दणक्यात आहे भाषणंही ऐकली, ती चांगली होती पण फारवेळ बसवत नाही त्यामुळे लवकर निघालो. संमेलनाचे अध्यक्ष नारळीकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता अधिक होती त्यांना प्रत्यक्ष बघता येईल या अपेक्षेने आलो होतो, मात्र निराशा झाली.
– शशिकांत सोनावणे, नाशिक
‘अभिजात मराठी’ दालनाला उत्तम प्रतिसाद
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने उभारलेल्या ‘अभिजात मराठी’ दालनाला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेषत: राष्ट्रपतींना पत्र धाडण्यासाठीच्या मोहीमेला लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाले.
भाषणाला कोणी नाही दर्दी, आसपासच्या परिसरात मात्र गर्दी
एकीकडे हे चित्र पाहायला मिळत असताना या मंडपाच्या शेजारीच असलेल्या फास्टफूड, चहा आणि इतर खानपानाच्या गोष्टी असलेल्या स्टॉलवर बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळत होती. हे साहित्य संमेलन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी या विद्या संकुलात आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी छगन भुजबळांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. विविध ठिकाणी आकर्षक शिल्पे ठेवण्यात आली असून हिरवळीचा परीसर हा सुंदर रोषणाईने सजविण्यात आला आहे. संमेलनात भाषणे सुरू असताना तरुण पिढी ही या ठिकाणी फोटो काढताना दिसत होती.
कोरोना आणि पावसाच्या भीतीमुळे अनेकांची संमेलनाकडे पाठ
नाशिकमध्ये गुरुवारी रात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. आधीच कोरोनाचे संकट असताना पावसाचे आव्हान सामोरे उभे ठाकल्याने साहित्य संमेलनाच्या आयोजकांची तारांबळ उडाली होती. आयोजकांनी त्यांची पूर्ण ताकद आणि जोर पणाला लावून संमेलन सुरू होण्यापूर्वी आलेले सगळे अडथळे पार केले. मात्र संमेलन सुरू असताना पाऊस आला तर काय या भीतीने अनेकांनी संमेलनाच्या पहिल्या दिवशी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. उरलेल्या दोन दिवसांत हे चित्र बदललेले असेल आणि संमेलनाला मोठी गर्दी होईल अशी आयोजकांना अपेक्षा आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरीअंटमुळे (Omicron) जगभरात पुन्हा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या या भीतीमुळे देखील अनेकांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं.

































































