‘राजा तू चुकतो आहेस’, लक्ष्मीकांत देशमुख यांचा पुनरुच्चार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एस.एम.पाटील । परळी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केंद्र सरकार वर पुन्हा आसूड ओढले आहेत. देशातील परिस्थिती अत्यंत बिकट असून सर्वसामान्यांची फरफट होत आहे, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे प्रतिपादन देशमुख यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधतांना केले आहे.

समाजभूषण स्व. श्री. सुवालालजी ललवाणी (वाकेकर) यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ते परळीत आले होते.गुजरातच्या बडोद्यात झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळीही संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी सरकारला कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यांचाच पुनरुच्चार त्यांनी परळीत केला. देशातल्या या परिस्थितीकडे आपण सर्वांनी वेळेतच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून ‘राजा तू चुकतो आहेस’ असा संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी परळीत पुनरुच्चार केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी, कॉमनवेल्थ खेळांमधील स्वर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे, जेष्ठ साहित्यिक मधू जामकर, डॉ.हरिश्चंद्र वंगे, चंदूलाल बियाणी, विजय वाकेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.