
सामना प्रतिनिधी । हिंगोली
सेनगाव तालुक्यातील सवना येथील एकाच कुटूंबातील तिघांनी कनेरगाव नाकाजवळील पैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला असून ग्रामस्थांनी कुटुंबप्रमुखाला पाण्यातून बाहेर काढत वाचविले आहे.
सेनगाव तालुक्यातील विठ्ठल नायक यांच्यासह त्यांची पत्नी शकुंतला विठ्ठल नायक, मुलगी उमा विठ्ठल नायक या तिघांनी एकत्र आज सकाळी ९ ते साडे नऊच्या दरम्यान पैनगंगा नदीत उडी घेतली. या घटनेमध्ये शकुंतला व उमा या दोघींचा मृत्यू झाला. तर पाण्यात गटांगळ्या खात असलेले विठ्ठल नायक यांना कनेरगाव नाका येथील नागरिकांनी बाहेर काढले. कनेरगाव नाका पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून याबाबत अधिक चौकशी करुन घटनेची नोंद केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































