
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
आई-वडील कंपनीत तर दोन्ही बहिणी शाळेत गेलेल्या असताना विकास मच्छिंद्र पवार या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना वाळूज सिडको महानगरात गुरुवारी उघडकीस आली.
सायंकाळी शाळेतून परत आलेल्या दोघी बहिणींना विकास छताला ओढणीने लटकला असल्याचे पाहून त्यांनी ओढणी धरून खाली ओढली तेव्हा विकास जमिनीवर कोसळून निपचीत पडलेला पाहून त्या घाबरल्या. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, विकासने हा टी.व्ही वर सुरू असलेल्या सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वाळुज-सिडको महानगरातील विकास मच्छींद्र पवार (11) हा चौथीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील औद्योगिक वसाहतीतील नायलॉन कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत तर आई त्या शेजारच्याच एका कंपनीत नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आइ वडील दोघे कंपनीत कामाला गेले होते तर त्याच्या दोघी बहिणी शाळेत गेल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार विकास घरात एकटाच टी.व्ही पाहत बसलेला होता. मात्र सायंकाळी त्याच्या बहिणी शाळेतून परत आल्या तेव्हा त्यांनी विकास छताला लटकलेला असल्याचे पाहिले. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे हेड कॉस्टेबल गणेश अंतरप यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात करत घटनास्थळावरून ओढणी जप्त केली आहे. विकासच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
बहिणीला वाटले विकास नाटक करतोय
विकासच्या दोन्ही बहिणी स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकतात. मोठी बहीण नववीत तर लहाणी सातवीत शिकते. विकासचा स्वभाव थट्टा करण्याचा होता त्यामुळे दोघी घरी परतल्या तेव्हा त्यांना तो फाशी घेतल्याचे नाटकच करतो आहे की काय असे वाटले. त्याचे नाटक उघडे पाडण्यासाठी बहिणीने ओढणी धरुन ओढली परंतु, त्याने खरोखरच फाशी घेतलेली होती. तो जमिनीवर मृतावस्थेत पडलेला पाहून त्यांनी त्याला हलवून जागे करण्याचाही प्रयत्न केला. पण त्याचा प्रतिसादच मिळेना तेव्हा त्यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांच्या मदतीने आई-वडिलांना बोलावून घेतले.






























































