दशावतारी कलावंत आनंद कोरगांवकर यांचा ठाणे कोकण महोत्सवात सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ 

भारदस्त अभिनय चातुर्याने विविध भुमिकांच्या सादरीकरणातुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे घावनळे (ता. कुडाळ)गावचे सुपूत्र आणि आघाडीचे दशावतारी कलावंत आनंद आत्माराम कोरगांवकर यांना ठाणे कोकण महोत्सव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दशावतारातील ‘राजेशाही कलाकार’ म्हणून त्याच्या या कलेतील यशस्वी वाटचाली बद्दल हा पूरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

आनंद कोरगांवकर यांनी रामेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ(घावनळे) या कंपनीतुन दशावतारी नाट्य क्षेत्रात सुरूवात केली. वयाच्या 20 व्या वर्षापासुन त्यांनी या कलेत पदापर्ण करीत यशस्वी वाटचाल करून नावलौकीक मिळविला आहे. पारंपारिक दशावतारी मंडळामधुन ते आज एक आघाडीचे राजपार्ट म्हणून ओळखले जातात. वडील स्व. आत्माराम कोरगांवकर यांच्या दशावतारी कलेचा वारसा ते पुढे चालवित आहेत. वीरभद्र, कर्ण, दशरथ, वसुदेव, कृष्ण, मारूती, पेंद्या, डोंब अशा विविधांगी भुमिका साकारत ते नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अभ्यासपूर्ण संवादफेक व अभिनय शैलीने विविध भूमिकांच्या सादरीकरणातुन रसिकांच्या मनावर छाप पाडणारे कलावंत म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला आहे.

ठाणे (मुंबई) सावरकरनगर शिवसेनेच्या वतीने व शिवसेना नेते, बांधकाममंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन कोकण महोत्सव भरविला जातो. या महोत्सवात दशावतारीतील यशस्वी कारकिर्दीबद्दल कोरगांवकर यांना ठाणे-कोकण महोत्सव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सावरकरनगर शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या कोकण महोत्सवात ठाणे महानगर पालिका शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्या हस्ते हा पुरस्कार कोरगांवकर यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवसेना नेते अनंत तरे, सुहास चव्हाण, ठाणे शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर, ‘तुला पाहते रे ’ मालिकेतील अभिनेत्री गायत्री दातार, कवठी युवक मित्रमंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर, भजनबुवा श्रीकांत शिरसाट तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कोरगांवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.