‘वर्दी’ची दहशत कमी झाली? दुचाकीस्वाराकडून पोलीस निरीक्षकास मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

आत्तापर्यंत शहरात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण केल्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता थेट वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकालाच रस्त्यावर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने ‘वर्दी’ची दहशत कमी झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुजीत रमाकांत दुबे (वय 45, रा. केशवनगर, मुंढवा) याला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

31 डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांकडून मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहिम राबविली जात होती. फिर्यादी पोलीस निरीक्षक शबीर सय्यद हे त्यांचे कर्मचारी सातपुते, काळे, ननवरे यांच्यासह मुंढवा चौकात कारवाई करत होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास एकजण भरधाव बुलेट वेडी वाकडी चालवत होता. त्यामुळे पोलीस शिपाई सातपुते यांनी त्याला आडविले. ब्रिथ अ‍ॅनलायझरने तपासणी करू देण्यास त्याने पोलिसांना नकार दिला. त्यावेळी सय्यद यांनी त्यास सहकार्य करण्यास सांगितले असता, दुबेने थेट सय्यद यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली. आचानक हा प्रकार घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्याला त्वरीत ताब्यात घेऊन मुंढवा पोलीस ठाण्यात नेले. त्यावर मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंढवा पोलिसांनी दुबेला न्यायालयात हजर केले असता त्याा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर, सहाय्यक निरीक्षक पंडीत रेजितवाड करत आहेत.