
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
गुजरातमधील पोलीस उपनिरीक्षक देवेंद्रसिंह राठोड यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. राठोड यांची बायको डिंपल हिने पोलीस उप अधीक्षक एन.पी.पटेल यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यामुळेच आपल्या नवऱ्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी सोमवारी मेव्हण्याच्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्यांचा मृतदेह अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात पडून आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा राठोड यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
देवेंद्रसिंह राठोड यांच्या पत्नी डिंपल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आत्महत्या करण्यापूर्वी त्यांचा नवरा जबरदस्त तणावाखाली होता. डिंपल यांनी त्यांना कारण विचारलं असता आपल्याकडे पोलीस उपअधीक्षक एन.पी.पटेल समलिंगी सुखाची मागणी करत असल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर डिंपल यांनाही धक्का बसला होता. आपल्या नवऱ्याने ही मागणी धुडकावल्याने पटेल यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली होती, चारचौघात काहीही कारण नसताना त्यांचा अपमान केला जात होता. या सगळ्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असं डिंपल यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणामुळे गुजरात पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून गुजरातच्या मंत्रिमंडळ बैठकीत वादळी चर्चा झाली. राठोड यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली असून त्यातही पटेल यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचं लिहल्याचं सांगण्यात येतंय. या चिठ्ठीच्या आधारे सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिलं आहे. अहमदाबादचे पोलीस आय़ुक्त ए.के.सिंह यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे.






















































