विजेच्या धक्क्याने फ्लेमिंगोचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजकुमार भगत । न्हावाशेवा

उरण येथील खाडीकिनारी भागातील सकस आहार आणि पोषक वातावरणामुळे येणाऱ्या पर्यटक पक्षांमधील फ्लेमिंगो पक्षी हा सर्वांचाच आकर्षणाचा भाग ठरला आहे. मात्र येथे पसरलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांमधील विजेच्या धक्क्याने फ्लेमिंगो पक्षी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शुक्रवार ता. 25 रोजी विजेच्या धक्क्याने एका फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र या फ्लेमिंगोच्या संरक्षणाकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पक्षीप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

नैसर्गिक संपत्तीने नटलेला उरण तालुका आहे. या निसर्गात येथील वन्यजीव अधिकच भर टाकत असतात. येथील खाडीभागातील पाणजे- डोंगरी या भागातील पाणवठ्यावर हजारो फ्लेमिंगोंसह विविध पक्षांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात. परदेशी पक्षी देखील मोठ्या संख्येने या भागात असल्याने पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार तसेच निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने येथे येत असतात. सकस आहार आणि पोषक वातावरण येथे असल्याने फ्लेमिंगो पक्षी हजारोंच्या संख्येने याठिकाणी जलविहार करताना पाहायला मिळतात. मात्र येथे असणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या सध्या या फ्लेमिंगी पक्षांना जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. जेएनपीटी प्रकल्पाकडे जाणाऱ्या या विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर याभागात असून, हे पक्षी विहार करताना विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्क्याने त्यांना प्राण गमवावे लागत आहे. दररोज 2 ते 4 पक्षी विजेचा धक्का लागून मृत्यू होत असल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. याबाबत वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.