Lok Sabha 2019 मुख्य निवडणूक आयुक्त वारंवार चुकतात तेव्हा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. राजधानीतील विज्ञान भवनात मीडियाची मोठी गर्दी होती. सायंकाळी पाच वाजता कोटय़वधी जनता आपल्या टीव्हीसमोर बसली होती. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ठीक 5 वाजता पत्रकार परिषद जाहीर केली, पण त्यांचा गोंधळ उडालेला दिसत होता. कधी मतदानाचा टप्पा सांगताना ते चुकत होते तर कधी राज्यांची नावे सांगताना चूक होत होती. उपस्थित पत्रकार वारंवार विचारून खात्री करून घेत होते. त्यानंतर अरोरा चूक दुरुस्त करीत होते.

पाहा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची संपूर्ण पत्रकार परिषद

ही तर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांपुढे शरणागतीच

जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक न घेण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे मोदी सरकारची पाकिस्तान, दहशतवादी आणि फुटीरतावादी हुर्रियत यांच्यापुढे सपशेल शरणागती आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज ट्विटरवरून व्यक्त केली.

कश्मीरची निवडणूक टाळण्यामागे दुष्ट हेतू

जम्मू-कश्मीरमध्ये फक्त लोकसभेचीच निवडणूक घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दुष्ट आहे. राज्यातील लोकांना स्वतःचे  सरकार निवडण्याची संधी नाकारणे हे लोकशाहीशी विसंगत आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीडीपी’च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती सईद यांनी आज व्यक्त केली.

लोकशाहीचा उत्सव!

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकशाहीचा उत्सव सुरू झाला’ अशी प्रतिक्रिया ट्विटरवरून व्यक्त केली. ही निवडणूक ऐतिहासिक निकाल देईल, अशी आशा व्यक्त करतानाच सक्रिय सहभागाने हिंदुस्थानातील जनतेने निवडणूक यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱया तरुण पिढीने मतदानाचा विक्रम नोंदवावा, असेही मोदी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.