
सामना ऑनलाईन। हाँगकाँग
तिसऱया आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱया पुण्याच्या मराठमोळ्या अवंतिका नराळे हिने रविवारी हिंदुस्थानला आणखी दोन पदक जिंकून देत डबल धमाका केला. तिने 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले, तर मुलींच्या मिडले शर्यतीतही अवंतिकाने रूपेरी यश संपादन केले. दीप्ती जीकांजी हिने 200 मीटर शर्यतीत हिंदुस्थानला कांस्यपदक दिले. या शर्यतीत अवंतिकाने 24.20 सेकंद, तर दीप्तीने 24.78 सेकंदांची वेळ नोंदवली.
शनिवारी झालेल्या 100 मीटर शर्यतीत पुण्याच्या 15 वर्षीय अवंतिकाने 11.97 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरून युवा गटात आशियातील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान पटकाकला होता. या स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने एकूण 26 (8 सुवर्ण, 9 रौप्य क 9 कांस्य) पदकांची कमाई करत पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न!
‘दहावीच्या परीक्षेपेक्षा आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी सरावावर मी जास्त लक्ष केंद्रित केले होते. इतक्या मोठय़ा स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जिंकल्यामुळे साहजिकच आनंद झाला. आता ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न आहे’, असे आपल्या चमकदार यशानंतर अवंतिका नराळे यांनी सांगितले.
मुलांच्या संघाची सोनेरी धाव
आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या मुलांच्या संघाने मिडले रिले शर्यतीत 1 तास 54.04 सेंकद वेळेसह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. करण एच, एसएस नालूबोथू, शशिकांत व्ही.ए. व अब्दुल रझाक यांनी हिंदुस्थानला हे यश मिळवून दिले.
पदकांची लयलूट
आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या पूजाने मुलींच्या 800 मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. महेश बाबू आणि सुमित खराब यांनी मुलांच्या 800 मीटर शर्यतीत हिंदुस्थानला अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकून दिले. मनदीप सिंग धलीवाल याने गोळाफेकीत 19.08 गोळा फेकून हिंदुस्थानला रौप्यपदक मिळवून दिले. मुलींच्या 1500 मीटर शर्यतीत चंदन चंथीनी हिने कांस्यपदक, तर मुलांच्या 3 हजार मीटर शर्यतीत जयपूरच्या अमित जांगीरने देशाला रौप्यपदक जिंकून दिले.


























































