जम्मू कश्मिरमध्ये 24 तासात चार चकमकी; चार दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मिरमध्ये गेल्या 24 तासात दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या चार ठिकाणी चकमकी झाल्या असून सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बंदीपोरामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचा समावेश आहे. तसेच बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपिया जिल्ह्यात एका घरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला आहे. तिथे चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे. गेल्या 24 तासात झालेल्या चार चकमकीत आतापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले आहेत.

चकमकीत खात्मा करण्यात आलेला लश्करचा कमांडर अली भाई पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात आले. बारामुल्लामध्ये कलंतरामध्ये शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत या कमांडरचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याचे श्रीनगरचे सुरक्षा दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू आहे.

जखमी झालेल्या जवानांना बदामीबागमधील लष्करी तळावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बारामुल्लामध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडहल्ला केल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. सोपोरमध्येही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका शिबिराबर हल्ला केला. त्यानंतर परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच परिसरात शोध मोहिम सुरू आहे.