लाच घेताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यकाला रंगेहाथ पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नांदेड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्यी स्वीय सहाय्यकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने तिथल्या नांदेड जिल्ह्यातील प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.  लक्ष्मण कानबाराव आसोले (52) असे या स्वीय सहाय्यकाचे नाव असून त्याने 21 हजारांची लाच मागितली होती, जी तक्रारदाराने घासाघीस करत 19 हजारापर्यंत खाली आणली होती.

वाळूच्या डंपरविरोधात जी कारवाई करण्यात येते, त्या कारवाईनंतर ते सोडण्यासाठी दंड भरावा लागतो. दंडापोटी 1 लाख 30 हजार रूपये दंड भरल्यानंतरही आसोले यांनी तक्रारदाराकडून 7 डंपर सोडण्यासाठी 21 हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोड करत तक्रारदाराने 19 हजार रूपये लाच देण्याचं मान्य केलं होतं. लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी,  उपविभागीय अधिकारी कार्यालय बिलोली येथे सापळा रचला होता. या सापळ्यामध्ये आसोले हे लाच घेताना रंगेहाथ सापडले. आसोले यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 2018 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच स्वीकारणाऱ्या लघुलेखकास जेरबंद करण्याची कार्यवाही पोलिस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलिस कर्मचारी शेख चाँद अलीसाब, सुरेश पांचाळ, अंकुश गाडेकर, शिवहार किडे आदींनी पार पाडली. लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे करणार आहेत.