वाहतुकीचे नियम मोडणार्‍या खासगी टॅक्सींना दणका, 21 लाख 77 हजार 400 रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल ऍपवर चालणार्‍या ओला-उबेरसारख्या खासगी टॅक्सींवर आरटीओने वाहतुकीचे नियम तोडल्याने जोरदार कारवाई केली आहे. 15 ऑक्टोबरपासून ते 9 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार अशा खासगी टॅक्सीचालकांकडून 21 लाख 77 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 235 प्रकरणांत परवाना निलंबन करण्यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाचा अहवाल मागवला आहे.

ओला आणि उबरसारख्या मोबाईलवर चालणार्‍या खाजगी टॅक्सीचालकांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा टॅक्सी चालकांची झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलवर असलेल्या ओला आणि उबर गाडय़ांची तपासणी करण्यात आली असता अनेक गाडय़ांच्या ड्रायव्हरकडे बॅच नसल्याचे उघड झाले आहे. अशा विनाबॅच वाहतूक करणार्‍या 335 वाहनांवर कारवाई करण्यात आली. इतर कारवाईत अनुक्रमे बॅच प्रदर्शित न करणे – 680, लॉग बुक न बाळगणे – 910, पर्यटन चिन्ह प्रदर्शित न करणे – 810, वाहन दोषी आढळणे – 990, अग्निशमन यंत्रणेची वैधता संपणे – 436 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 235 प्रकरणांत परवाना निलंबनाबाबत परिवहन कार्यालयास कळवण्यात आले आहे. या प्रकरणांत 18,77,400 रुपयांचा दंड व तडजोड शुल्क आणि 3 लाखांचा न्यायालयीन दंड असे मिळून एकूण 21 लाख 77 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

येथेही भाडे नाकारणे सुरूच!

मोबाईल ऍपवर टॅक्सी बुक केली आणि प्रवाशाने ती काही कारणाने रद्द केली तर प्रवाशाच्या खात्यातून 50 रुपये वगळले जातात. परंतु हे खाजगी टॅक्सी चालक प्रवाशांना फोन करून कुठे जायचे आहे असे ठिकाण विचारून स्वतः भाडे रद्द करीत आहेत. त्यांच्यावर मात्र कंपनीने कोणताही दंड आकारण्याची तरतूद ठेवली नसल्याकडे अधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्यावर भाडे नाकारल्या प्रकरणी कारवाई करणे गरजेचे असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.