राज्यभरातील पोलिसांच्या कामगिरीला सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे

राज्यभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे गावापासून ते दिल्लीपर्यंत शुकशुकाट झाला आहे. सरकारी कार्यालये, खासगी वंâपन्या, हॉटेल, मॉल, प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीतही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या राज्यातील पोलिसांनी पुन्हा एकदा स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत प्रत्येकाकडून ड्युटीवर हजर राहून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीदवाक्याला साजेसे काम केले जात आहे.

जगभरात कोरोनाचा हैदोस वाढल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. व्हायरसची भीती, अफवा आणि जीव वाचविण्यासाठी बहुतांश जणांकडून नानाविध प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मात्र राज्यभरातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कुटुंब, संसार, लहान मुले, वृद्ध आई-वडिलांचे आजारपण सोडून आजही नेहमीप्रमाणे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीदवाक्याजोगे काम करीत आहेत. एरवी सण-उत्सव, राष्ट्रीय महापुरुषांच्या पुण्यतिथी-जयंती, व्हीआयपी बंदोबस्त, गर्दीवरील नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सदैव कार्यरत असलेल्या पोलिसांनी पुन्हा एकदा कोरोना महामारीविरुद्ध वंâबर कसली आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध विभागांत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. राज्य सरकारने सोमवारपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नगर, लातूर, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह सर्वच ठिकाणी पोलिसांकडून चौकाचौकांत बंदोबस्त सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कौटुंबिक स्वसंरक्षणाआधी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. याद्वारे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याची खंबीरता महाराष्ट्र पोलिसांनी ड्युटीवरून सिद्ध केली आहे.

संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसह काही समाजकंटकांकडून होणारा उपद्रव टाळण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केली आहे. त्यानुसार नागरिकांच्या अडी-अडचणींसाठी पोलीस वंâट्रोल रुममधून ठाण्यांना कॉल देऊन समस्या सोडविली जात आहे. वाहतूककोंडी, रस्त्यावरील अपघात, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची मदत, विविध अडचणींसंदर्भात नियंत्रण कक्षातून (क्रमांक १००) आलेला कॉल तातडीने संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला जात आहे. कंट्रोल रूममधून मिळालेल्या कॉलनुसार संबंधित पोलीस ठाण्यातील दामिनी पथक, बीट मार्शल, पेट्रोलिंग पथकातील कर्मचाऱ्यांकडून तातडीने घटनास्थळी धाव घेतली जात आहे. त्यानंतर ड्युटीवर रात्री-अपरात्री घटनेची सत्यता पडताळली जात आहे. त्यानंतर बीट मार्शल, दामिनी पथकाकडून कंट्रोलला फोन करून मदत पोहोचविल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे एकीकडे स्वतःची सुरक्षितता वाढविण्यासाठी नागरिकांची अट्टाहास आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पोलिसांकडून सचोटीने प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी शहरातून गावचा रस्ता धरला आहे. दुसरीकडे मात्र राज्यभरात संचारबंदी लागू झाल्यामुळे सर्व पोलीस कर्मचाNयांपासून अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या नागरिकांसह त्यांच्या कुटुंबांसाठी राज्यभरातील बहुतांश पोलिसांनी कौटुंबिक अडचणींना बाजूला ठेवून ड्युटीला प्राधान्य दिले आहे. राज्यभरात पोलीस आयुक्तालयासह ठाण्यांतर्गत हद्दीतील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी फलक लावणे, भित्तिपत्रके चिटकविणे, लाउड स्पीकरद्वारे माहिती देणे, सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चाकरमान्यांसह व्यावसायिकांनी घरीच बसणे पसंत केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून राज्य शासनाने लॉकडाउन केल्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग, कंपन्या बंद आहेत. अशास्थितीत राज्यभरातील पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. विशेषतः प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत महिलांसह ज्येष्ठ नागरिक, तरुण-तरुणींच्या सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. हद्दीतील पोलीस पेट्रोलिंग, बीट मार्शलचा राउंड, दामिनी पथकाची गस्त, ‘भरोसा सेल’कडून करण्यात येणारे समुपदेशन, कंट्रोलमधून नागरिकांना दिला जाणारा प्रतिसाद, सरकारच्या आदेशाचे पालन करीत पोलिसांनी कर्तव्यावर तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या महामारीतही पोलिसांच्या कामात अद्यापही खंड पडला नाही. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्यापासून पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, शहराचे पोलीस आयुक्त, प्रत्येक शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी इमानइतबारे कामे करीत आहेत. त्यामुळे संकट कितीही गंभीर असले, तरी राज्यातील पोलिसांचे काम अभेद्यच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे समाजाला कुटुंबाचा भाग समजून जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व पोलिसांना सलाम केलाच पाहिजे.

पोलिसांना सहकार्य करा; नाहीतर कारवाईला सामोरे जा

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी कायदा लागू केला आहे. त्याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला रस्त्यासह गल्लीबोळात घोळक्याने फिरता येणार नाही. वाहन चालविणे, मुक्त संचार करणे, जागोजागी उभे राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांकडून अत्यावश्यक सेवा वगळून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनो, गावांपासून तालुक्यांपर्यंत आणि शहरांपासून मेट्रो शहरांपर्यंत पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग हद्दपार करण्यात यश मिळणार आहे.