
>> दिलीप जोशी
दिवाळीला चार दिवस राहिलेत. नंतरचे चार दिवस दिवाळीचे. दिव्यांना आणि पर्यायाने केवळ प्रकाशाला प्राधान्य देणारा हा जगातला एकमेव सण. याचं कारण जगात इतरत्र कुठेही पावसाळा हा संपूर्ण ऋतू नाही. सलग चार महिने ढगाळलेलं आकाश आणि नंतर एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश असं घडत नाही. युरोपातील इंग्लंडसारख्या देशात आकाश वर्षभर ढगाळच असतं, तर विषुववृत्ताजवळच्या देशांत वर्षभर थोड थोडा पाऊस पडत असतो. पण आपल्याकडे पाऊस वेळेवर आला, नियमित पडला तर धान्यावर धन घेऊन नवान्न पौर्णिमा येते. त्यानंतर दिवाळीचे प्रकाशपर्व! या चार दिवसांत महत्त्व असतं ते केवळ तेजाला.
याचं आणखी एक कारण म्हणजे दक्षिण गोलार्धात गेलेला सूर्य. आपल्याकडचा दिवस ‘लहान’ वाटतो. रात्र ‘मोठी’ होते. साहजिकच रोजचीच दिवेलागणीची वेळही बदलते. यंदा तर अश्विन महिना ‘अधिक’ आल्याने दिवाळी इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे नोव्हेंबरात गेली. धनत्रयोदशीपासून दिवाळीचा आरंभ मानला तर 13 ते 16 नोव्हेंबर असे या वर्षीच्या दीपोत्सवाचे महत्त्वाचे दिवस. परंतु उत्सव म्हटला की तयारी आधीच सुरू होते आणि त्याची रोषणाई उत्सव संपला तरी बराच काळ उत्साहाच्या रूपात रेंगाळते. दारी लागलेला आकाशकंदील थेट तुळशीच्या लग्नापर्यंत लावला जातो. रांगोळय़ांची आरास, नवे कपडे, वस्तू, फराळ असा सर्वंकष आनंदसोहळा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने साजरा करतो.
या वर्षीची परिस्थिती वेगळीच आहे हे नव्याने सांगायला नको. राज कपूरच्या चित्रपटात एक गाणं आहे. ‘एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है, उजडा हुआ गुलशन है…’ वगैरे. आता ही त्या नायकाची व्यक्तिगत व्यथा आहे; परंतु सध्या सर्व जगाचीच भावना अशी झाली असेल. अर्थात आशेचे नवे दिवे उजळणाऱया चार चांगल्या बातम्या येतात तेव्हा बरं वाटतं. तरीही हातचं पीक गेलेले शेतकरी, रोजगार गमावलेले कष्टकरी आणि महासाथीत आप्तजन गमावलेली माणसं यांच्या जीवनातला अंधार लवकर कसा दूर करता येईल यासाठी सर्वांनीच जमेल तसे प्रयत्न करायला हवेत. दिवाळीत सुखाचा काळ येवो अशी अपेक्षा करूया.
सुखदुखाच्या दिवाळय़ा व्यक्तिगत जीवनात येतातच. त्यातले मन उजळणारे चार चांगले क्षण आठवले तर मनाला थोडी उभारी मिळते. दिवाळीतली अमावास्याही आपण प्रकाशमय करतो. आयुष्याचं असंच असतं. नव्या उमेदीचा अंतरीचा दिवा तेवत ठेवावा लागतो.
बरोबर पंचवीस वर्षांपूर्वीच्या दिवाळीतली ‘तेजस्वी’ अमावास्या मला आठवते. 1995च्या दिवाळीतल्या अमावास्येला खग्रास सूर्यग्रहण होतं. ते पाहायला आम्ही तीनशे जण उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर या छोटय़ा गावात दोन दिवस आधीच पोचलो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिथल्या एका सुट्टीमुळे रिकाम्या असलेल्या शाळेत आमचा मुक्काम होता. आम्ही पहाटे सनई लावली. रांगोळय़ा चितारल्या. फराळाचं इथून नेलं होतं ते आमच्या बरोबरच तिथल्या गावकऱयांनाही दिलं. ‘खग्रास सूर्यग्रहणा’चं महत्त्व ठिकठिकाणी कार्यक्रम करून समजावून सांगितलं. कानपूरचे जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पोलीस प्रमुख सर्वांची भेट घेतली. आम्ही मराठी मंडळी खास तुमच्या भागातूनच दिसणारं ‘खग्रास’ सूर्यग्रहण पाहून इथेच वैज्ञानिक दीपोत्सव साजरा करणार आहोत, असं सांगितल्यावर सर्वांचे भरभरून सहकार्य मिळालं. गावातून शंभरेक पणत्या आणल्या. फटाके अर्थातच नव्हते, पण गाणी-गप्पांच्या गजरात दिवाळीचा पहिला दिवस पार पडला आणि दुसऱया दिवशी सकाळी साडेआठला आकाशातली ‘दिवाळी’ अनुभवली. सूर्यबिंबातून प्रगटलेली ‘हिऱयाची अंगठी’, प्रभामंडळ आणि भरदिवसा दिसलेल्या चमचमत्या ताऱयांच्या रोषणाई’ने ती दिवाळी आगळीवेगळी ठरली.
अनेक ठिकाणच्या प्रवासातल्या अनेक दिवाळय़ा स्मरतात तेव्हा आठवणींचे दीप उजळत जातात. ऑक्टोबरमधल्या एका दिवाळीत कोकणातल्या एका खेडय़ात संध्याकाळी गावात दीपोत्सव आणि आसपासच्या झाडाझुडुपांवर चमचमणारे काजवे तसेच वर लखलखणारं तारकाभरलं आकाश असा प्रकाशाचा त्रिवेणी संगम अनुभवता आला.
स्मृतींच्या पानावरचे असे अनुभव नुसते आठवले तरी पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. यंदा सारंच वातावरण एका विचित्र परिस्थितीने कोंदट झालं असलं तरी हा काळही जाईल. पुन्हा एकदा जगाच्या जीवनात सुखसमृद्धीचा नवा दीप उजळेल, कारण कालचक्रात अंधाराप्रमाणेच उजेडही येतच असतो.
पन्नास वर्षांपूर्वी बंगाली भाषा शिकताना पाठ केलेली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आठवली. त्याचं मुक्त रूपांतर साधारण असं-
‘माझे काम कोण करेल?’
मावळतीचा सूर्य-स्वर
ऐकून सारे स्तब्ध, सृष्टी झाली निरुत्तर
दीप सानुला मातीचा, मग वदला ‘स्वामी’
तितुके आहे शक्य मला ते, करेन मी!’
त्या ‘सानुल्या’ दिव्याप्रमाणे अंधार घालवण्याची जिद्द धरली तर! प्रयत्न करूया. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा!


























































